पुणेकरांचा साेमवार ठरला वाहतूक काेंडीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 07:15 PM2019-07-01T19:15:29+5:302019-07-01T19:16:19+5:30
साेमवारी शहरातील विविध रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. या वाहतूक काेंडीमुळे वाहनचालकांना तासणतास वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले.
पुणे : साेमवारचा दिवस पुणेकरांसाठी डाेकेदुखी देणारा ठरला. सकाळपासूनच शहरातील विविध भागात माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. त्यामुळे वाहनचालकांना जवळचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाउणतास लागत हाेता. त्यामुळे सकाळी लवकर कार्यालय गाठणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. संध्याकाळपर्यंत शहरातील वाहतूक काेंडी कायम हाेती.
आठवडाभरापासून वरुणराजाने पुण्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्यामध्ये देखील वाढ झाली आहे. असे असताना दुसरीकडे पावसामुळे वाहतूक काेंडीची समस्या वाढली आहे. साेमवारी पुणे शहरातील सर्वच महत्त्वाच्या भागांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता, काेथरुड, शिवाजीनगर, बीएमसीसी रस्ता या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. ज्ञानेश्वर पादुका चाैकामध्ये वाहतूकीचा बाेजवारा उडाला हाेता. सकाळी वाहतूक काेंडी झाल्याने चाकारमान्यांना वेळेवर कार्यालयात पाेहचता आले नाही. वाहतूक काेंडीमुळे पादचाऱ्यांना देखील रस्त्यावरुन चालणे अवघड झाले हाेते. संध्याकाळी देखील या सर्व भागात सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली.
साेमवारी शहरातील काही सिग्नल्स बंद असल्याने वाहतूक काेंडीत भर पडली. कर्वे रस्त्यावर मेट्राेचे काम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु हाेती. फर्ग्युसन रस्त्याचे नुकताच नुतनीकरण करण्यात आले आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ माेठे करण्यात आले आहेत. परंतु या नव्या रचनेमुळे वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने या रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतूककाेंडीत वाढ हाेत असते. साेमवारी अनावधानेच पाेलीस कर्मचारी वाहतूक नियमन करताना दिसले.
पुण्यात लाेकसंख्येपेक्षा अधिक वाहने
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची पुण्यात संख्या आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. त्याचबराेबर गेल्या काही वर्षात शहरात चारचाकींची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यात भर म्हणून ओला, उबेर सारख्या टॅक्सींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक काेंडीमध्ये भर पडताना दिसत आहे. येत्या काळात वाहनसंख्येवर नियंत्रण न आणल्यास परिस्थिती अधिक गंभीर हाेण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.