बोटांच्या ठशांच्या आधारे काढता येणार पैसे
By admin | Published: April 16, 2017 04:11 AM2017-04-16T04:11:37+5:302017-04-16T04:11:37+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केवळ हाताच्या बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारे ‘मायक्रो एटीएम’ मशीन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केवळ हाताच्या बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारे ‘मायक्रो एटीएम’ मशीन शोधून काढले आहे. त्यासाठी नागरिकांचा आधारकार्डचा डेटा बँक खात्याशी जोडावा लागेल. परिणामी, क्रेडिट कार्ड किंवा डेबोट कार्डऐवजी आता सर्व व्यवहार बायोमेट्रिकच्या आधारे करता येतील. विद्यापीठात स्थान केल्या जाणाऱ्या ‘सेंटर फॉर इंटेलिजंट सिस्टीम’च्या माध्यमातून ही यंत्रणा तयार केली जाणार आहे.
विद्यापीठात ‘सेंटर फॉर इंटेलिजंट सिस्टीम’ स्थापन केली जाणार असून, येत्या सोमवारी (दि. १७) केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन आॅनलाईन पद्धतीने होईल. केंद्राच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियन (रुसा) योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामार्फत इंटेलिजंट सिस्टीम सेंटर चालविले जाणार आहे. सध्या नागरिकांना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने आर्थिक व्यवहार करावे लागतात. मात्र, विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने शोधलेल्या तंत्रज्ञानामुळे बायोमेट्रिकच्या साह्याने आर्थिक व्यवहार करणारे करता येतील. आधार कार्डसाठी बोटांचे ठसे, डोळ्यांचे छायाचित्र (आय स्कॅन ) घेण्यात आले आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी जोडून बोटांच्या ठशाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील. याबाबत तंत्रज्ञान विभागाकडून संशोधन सुरू होते त्याला यश आले आहे. तसेच त्याचे पेटंटही मिळाले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार बिनचूक व्हावेत, यासाठी आवश्यक असेलल्या सुरक्षिततेच्या सर्व तांत्रिक पातळ्याही पूर्ण केल्या आहेत.
तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केलेल्या संशोधनामुळे बायोमेट्रिकच्या साह्याने आर्थिक व्यवहार करणे सहज शक्य होईल. आधार कार्डचा डेटा बँक खात्यांशी जोडला गेल्यास मायक्रो एटीएमवरून बोटांच्या ठशाच्या साह्याने पैसे देता किंवा घेता येतील. विभागाने आवश्यक संशोधन केले असून, आता केवळ अत्याधुनिक मशीन तयार करण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी विद्यापीठाने पर्सिस्टंट कंपनीला बरोबर घेतले असून, त्या संदर्भातील काही बँकांबरोबर बोलणी सुरू केली आहेत. त्यामुळे पुढील काळात एटीएम कार्ड वापरण्याची आवश्यकता भासणार नाही.
हॉटेलमध्ये बील देण्यासाठी मायक्रो एटीएम मशीनवर केवळ बोटांचे ठसे दिल्याने संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून हॉटेल चालक स्वत:च्या बँक खात्यात पैसे जमा करून घेवू शकेल. हे मायक्रो एटीएम मशीन स्वाईप मशीनच्या आकाराचे असेल. बँकांमध्येही आर्थिक व्यवहारासाठी या मशिनचा वापर करता येईल.त्यामुळे डिजिटल बँकिंग व्यवहाराला अधिक चालना मिळेल.
- डॉ. अदित्य अभ्यंकर, प्रमुख, तंत्रज्ञान विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ