Pune: कॅशियरच्या नावाने बँकेतच घातला गंडा; पुणे शहरातील घटना
By विवेक भुसे | Published: June 14, 2023 06:07 PM2023-06-14T18:07:10+5:302023-06-14T18:10:01+5:30
या प्रकरणी एका उंड्री येथील ५३ वर्षाच्या कर्मचाऱ्याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
पुणे :बँकेतून मोठी रक्कम काढलेल्या एका कर्मचाऱ्याला चोरट्यांनी बँकेच्या कॅश काैंटरजवळच कॅशियरच्या नावाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका उंड्री येथील ५३ वर्षाच्या कर्मचाऱ्याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ढोले-पाटील रोडवरील कंपनीत कामाला आहे. कंपनीतील व्यवस्थापकाने त्यांना बँकेतून ३ लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. पैसे काढून आणण्यासाठी ते कॅम्पमधील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत गेले. त्यांनी बँकेत धनादेश जमा करून ३ लाख रुपये काढले. रोकड बॅगेत ठेवत असताना कॅश काैंटरजवळ उभा असलेल्याने माणसाने त्यांना पेन्सिलने खुणा केलेल्या व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे, असे सांगितले.
त्यांना तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले. हे घेऊन तो नजर चुकवून पसार झाला. काही वेळाने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.