मंदिरातल्या सहाय्यक मॅनेजरनेच चोरले दानपेटीतील पैसे; दौंडमधील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:21 PM2021-10-26T16:21:24+5:302021-10-26T16:21:32+5:30
दौड तालुकयातील देऊळगावगाडा येथील श्री सदगुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट येथील मंदिरामध्ये चोरी झाली
खोर : दौड तालुकयातील देऊळगावगाडा येथील श्री सदगुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट येथील मंदिरामध्ये चोरी झाली आहे. दत्त मंदीरातील दान पेटीतील पैसे चोरीला गेले असून चक्क मंदिराच्या सहाय्यक मॅनेजरनेच पैसे चोरल्याचा खळबळजनक प्रकारत समोर आला आहे. याबाबत संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय साहेबराव शितोळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोरोनाच्या कालावधीत मंदिर परिसर भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी बंद करण्यात आले होते. दरम्यान संस्थानचे मॅनेजर संजय शितोळे हे येथील कामकाज पुणे व कधी देऊळगावगाडा येथून मंदिराचे कामकाज पाहत असत. यावेळी सहाय्यक मॅनेजर म्हणून वढाणे (ता.बारामती) येथील छगन चौधरी हे कामकाज पाहत होते. त्यावेळी सहाय्यक मॅनेजर छगन चौधरी यांनी दत्त मंदिराच्या दानपेटीतील चक्क ४ हजार रुपये काढले असल्याचे १७ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरच्या सीसीटीव्हीतून उघडकीस आले आहे.
याबाबत संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी छगन चौधरी यांना याबाबत विचारणा केली असता चौधरी यांनी भक्तांनी टाकलेल्या दानपेटीतील ४ हजार रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार दि.२५ ऑक्टोबर रोजी संस्थानच्या विश्वस्तांनी बैठकीचे आयोजन करून यवत पोलिस ठाण्यात छगन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.