Pune Crime: तुमच्या विरोधात मनी लाँड्रिंगची केस! महिलेला १३ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: June 14, 2024 07:00 PM2024-06-14T19:00:02+5:302024-06-14T19:00:45+5:30
पोलिसी कारवाईची भीती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. १३) चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : तुमच्या विरोधात मनी लाँड्रिंगची केस दाखल आहे, तुम्हाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात यावे लागेल, अशी भीती दाखवून महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसी कारवाईची भीती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. १३) चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खराडी भागातील ५२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ मे ते ७ जुलै २०२४ रोजी घडला आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये आले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून, त्यासाठी तुमचे आधार कार्ड व बँक खात्याचा वापर करून करोडो रुपयांची मनी लाँड्रिंग करण्यात आली आहे, असे सांगून एक लिंक पाठवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, असे सांगून अटकेची भीती दाखवली.
तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत महिलेला १३ लाख ८३ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक खांडेकर करत आहेत.