Pune Crime: तुमच्या नंबरवर मनी लॉन्ड्रिंग; महिलेला १७ लाखांनी गंडविले
By भाग्यश्री गिलडा | Published: February 22, 2024 03:20 PM2024-02-22T15:20:47+5:302024-02-22T15:21:32+5:30
याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे....
पुणे : बेकायदेशीर कॉल्स तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक वापरला जात आहे, अशी भीती दाखवून महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन ट्राय संस्थेतून कीर्ती बोलत असल्याचे भासवले. तुमचा आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक बेकायदेशीर कामात तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापरले जात आहे, असे सांगून फिर्यादी महिलेला भीती दाखवली. याबाबत मुंबई येथील भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे सांगून फोन ठेवला. पुन्हा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून भायखळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप राव आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे भासवले.
स्काइप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून तुमचे कॅनरा बँकेचे खाते फ्रीझ केले आहे, असे सांगितले. खात्याची माहिती घेऊन त्यातून १७ लाख २९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे करत आहेत.