जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:41 PM2017-11-13T15:41:48+5:302017-11-13T15:57:18+5:30

समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही.

money wastage on water pipeline by corporator; Silence of Pune Municipal Administration | जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन

जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन

Next
ठळक मुद्देनगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील जलवाहिन्या बदलण्याची खर्चिक कामे सुरू, प्रशासनाचे दुर्लक्षराष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी मागवला प्रशासनाकडून अहवाल

पुणे : समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही. योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आता काही महिन्यांचाच अवधी राहिलेला असतानाही नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील जलवाहिन्या बदलण्याची खर्चिक कामे सुरू आहेत, व प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ही कामे प्रत्येक नगरसेवकाची १० ते २० लाख रूपये अशी लहान दिसतात, मात्र अशा काही नगरसेवकांची कामे एकत्र केली तर ती कोट्यवधी रूपयांची होतात. २४ तास पाणी योजनेत सर्व जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जाणार आहे, तर मग ही लहानलहान कामे करण्यात प्रशासन व नगरसेवकही का रस दाखवत आहे, याविषयी प्रशासनाकडून मौन बाळगण्यात येत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी सर्वसाधारण सभेत जाहिरपणे हा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना पदाधिकार्‍यांनी. तुपे यांनी आता प्रशासनाकडून याबाबतचा अहवालच मागवला आहे.
तब्बल १ हजार ८०० कोटी रूपये फक्त जलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी लागणार आहेत. संपूर्ण शहरातील सध्या वापरात असलेल्या जलवाहिन्या काढून टाकून नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या योजनेसाठी म्हणून शहराचे जवळपास ३५८ भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात साधारण दीड ते दोन हजार नळजोड असतील. मुख्य वाहिनी, त्याला जोड वाहिन्या, त्यावरून ग्राहकांपर्यंत वाहिनी व त्यावर नळ, यातील मुख्य वाहिनीला व ग्राहकाच्या वाहिनीला मीटर असेल. त्यावर किती पाणी दिले व किती वापरले गेले याची नोंद होईल. त्या नोंदींवरून ग्राहकांना बील पाठवले जाईल. हे काम किमान एक ते दोन वर्ष सुरू राहणार आहे.
सध्या वापरात असलेल्या जलवाहिन्या जुन्या आहेत, त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे त्या बदलण्यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव देण्यात येतात. नागरिकांची तशी मागणी असते. गेल्या दोन ते तीन वर्षात हे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या एका कामावर महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे. एकदा जलवाहिनी बदलली की किमान २५ वर्षे तरी चालावी असे अपेक्षित असते. नगरसेवकांचे प्रस्ताव पाहिले असता गेल्या काही वर्षात शहरातील बहुतेक भागांमध्ये जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. उपनगरांशिवाय मध्यभागात म्हणजे पेठांमध्येही हे प्रमाण बरेच आहे. या चांगल्या असलेल्या, नुकत्याच टाकलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार याविषयी प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी तुपे यांनी केली आहे.
यापूर्वी रस्त्यांवर एलईडी दिवे बसवतानाही जुन्या चांगल्या दिव्यांचे काय करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. ते सर्व दिवे ठेकेदाराला मिळाले असल्याची चर्चा आहे. शहरातील ७० हजार पथदिवे बदलून तिथे एलईडी दिवे टाकण्यात आले होते. आताही जलवाहिन्या बदलण्याचे काम ठेकेदारामार्फतच करून घेण्यात येणार आहे. जुन्या जलवाहिन्यांची रस्त्यांमधील नेमकी जागा शोधून टाकण्यात आल्या आहेत. नव्या टाकतानाही त्या तिथेच टाकाव्या लागणार आहेत. त्यावेळी जुन्या चांगल्या असलेल्या जलवाहिन्या आहे तशाच राहू दिल्या तर ठेकेदाराचा त्यात फायदा होणार आहे, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

Web Title: money wastage on water pipeline by corporator; Silence of Pune Municipal Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.