पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाची ओळख पटली
By admin | Published: April 12, 2016 04:24 AM2016-04-12T04:24:01+5:302016-04-12T04:24:01+5:30
कुरकुंभ येथे ५० कोटींचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू मांत्रिक बाबाची अखेर ओळख पटण्यास पोलिसांना यश आले आहे. त्याचे रेखाचित्र तयार झाले असून लवकरच त्याला अटक केली जाईल
दौंड : कुरकुंभ येथे ५० कोटींचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू मांत्रिक बाबाची अखेर ओळख पटण्यास पोलिसांना यश आले आहे. त्याचे रेखाचित्र तयार झाले असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
अशोक सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्या चेल्याचे नाव जावेद आहे. ८ मार्चच्या मध्यरात्री कुरकुंभ येथील एका बंद पडलेल्या निर्जन ठिकाणच्या हॉटेलमध्ये संबंधित भोंदू मांत्रिक बाबाने आर्थिक लूटमार करून चारही बांधकाम व्यावसायिकांना मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात लोकमतने ९ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने एकच खळबळ उडाली होती. ‘५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो’ या आमिषाला बळी पडलेल्या चौघांना या भोंदू महाराजाने पुण्याहून येताना गाडीतच पेढे खायला देऊन त्यांच्यावर भूल टाकण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पुढे आली आहे. कुरकुंभला आल्यानंतर या भोंदू महाराजाचे पितळ उघडे पडल्यावर त्याच्यासह त्याच्या शिष्याने पलायन केले होते. बेशुद्ध पडलेल्या चौघांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेले खान व त्यांचे बंधू अकील खान यांनी तातडीने दौंडच्या पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये आणल्याने व वेळीच त्यांच्यावर उपचार झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.पोलीस या दोन्ही भोंदू महाराजांचा शोध घेत आहेत; मात्र महाराजाच्या आमिषाला बळी पडलेलेदेखील पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे समजते. (वार्ताहर)
शुद्धीवर आल्यानंतर या चौघांनीही दौंड पोलिसांना घडलेली माहिती दिली, तर यातील दोघांचे जबाब घेण्यात आले असल्याचे समजते. या चौघांपैकी एक चित्रकार असल्याने व त्याने भोंदू मात्रिकाला प्रत्यक्ष पाहिले असल्यामुळे या भोंदू महाराजाचे रेखाचित्र पोलिसांना प्राप्त झाले आहे.