दिलासादायक! भारतात मंकीपाॅक्सचा एकही नमुना अद्याप मिळालेला नाही, NIV ची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:55 AM2022-05-25T09:55:47+5:302022-05-25T09:59:10+5:30
एनआयव्हीच्या संचालक डाॅ. प्रिया अब्राहम यांची माहिती...
पुणे : मंकीपाॅक्सचा अद्याप एकही संशयित किंवा निदान झालेला रुग्ण आढळलेला नाही. तसेच सध्याची परिस्थिती पाहता याचा नमुना प्राप्त हाेऊ शकताे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) संचालक डाॅ. प्रिया अब्राहम यांनी दिली.
मंकीपाॅक्स रुग्णांची संख्या वाढत आहे. युराेपसह आतापर्यंत पंधरा देशांत हे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर देशभरात मंकीपाॅक्स रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी व निदान करणारी पुण्यात असलेली व देशासाठी एकमेव एनआयव्ही ही केंद्रीय आराेग्य विभागाची प्रयाेगशाळा आहे. याबाबत एनआयव्हीच्या संचालक डाॅ. प्रिया अब्राहम यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, याबाबत आम्हाला राज्याकडून विचारणा हाेत आहे. त्यामुळे रुग्णांचा नमुना लवकरच प्राप्त हाेऊ शकताे, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
काेराेनाच्या काळात भारतीय केंद्रीय आयुविर्ज्ञान अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत असलेल्या एनआयव्हीमध्येच सुुरुवातीला नमुन्यांची चाचणी हाेत हाेती. केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातील रुग्णांच्या नमुन्यांचीही चाचणी एनआयव्हीकडून केली हाेती. त्याप्रमाणेच आताही परदेशातून काही नमुने प्राप्त झाले आहेत का? असे विचारले असता डाॅ. अब्राहम यांनी जेव्हा नमुना मिळेल तेव्हाच त्याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, केंद्रीय राेग नियंत्रण केंद्राने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार जे प्रवासी गेल्या २१ दिवसांत मंकीपाॅक्स बाधित देशांत जाऊन आलेले आहेत, त्यांना ताप, अंगावर पुरळ उठणे अशा लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. राज्याच्या साथराेग विभागाने या सूचना पुढे जिल्ह्याला दिल्या आहेत. एकात्मिक राेग सर्वेक्षण प्राेग्राम अंतर्गत अशा संशयित रुग्णांची माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन केले आहे. संशयित किंवा पाॅझिटिव्ह रुग्णांना ते बरे हाेईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे व त्यांच्यावर याेग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.