Maharashtra | महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची शेतकऱ्यांना हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:14 PM2022-05-28T13:14:20+5:302022-05-28T13:24:34+5:30
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट...
नितीन चौधरी
पुणे : यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण तर ठरलाच मात्र, त्याचा परिणाम अवकाळी पावसावरही झाला. राज्यात मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
मार्च ते मे हा काळ म्हणजे अवकाळी पावसाचा काळ. यामुळे शेतातील उभ्या पिकांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. मात्र, मे महिन्यात येणाऱ्या पावसाचा फायदा काही प्रमाणात खरीप पिकांच्या पूर्वमशागतीसाठी होतो. यंदा मात्र, राज्यात तसेच देशातही वेगळी परिस्थिती दिसून आली आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालाच नाही. त्यात ठाणे, नंदूरबार, जालना, बीड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर व वर्धा या विदर्भातील, तर लातूर, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील व रायगड जिल्ह्यांत अवकाळी पावसात सुमारे ९३ ते ९६ टक्क्यांची घट झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील घट ही ७६ टक्के आहे. पालघर व नाशिकमध्ये ८५, नगरमध्ये ८३, साताऱ्यात ६८ व गडचिरोलीत ६३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांची मोठी घट (६० ते ९९ टक्क्यांची घट) अशी वर्गवारी केली आहे. तर घट असलेल्या जिल्ह्यांत जळगाव (३०), धुळे (२४), औरंगाबाद (५८), सोलापूर (२६) व उस्मानाबाद (४०) यांचा समावेश आहे. तसेच सामान्य पाऊस झालेल्या (अधिक १९ ते उणे १९ टक्के) जिल्ह्यांमध्ये सांगली (उणे १९), रत्नागिरी (उणे ११) व सिंधुदुर्ग (अधिक १६) यांचा समावेश आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के जादा पाऊस झाला आहे.
देशातील ९ टक्के म्हणजेच तब्बल ६६ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यात गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १४ व महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, “यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांनंतरचा सर्वात उष्ण ठरला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता शिल्लकच नव्हती. पश्चिमी वारेसुद्धा अतिशय कोरडे वाहत होते. भूपृष्ठीय तापमानही सुमारे ६० अंशांपर्यंत पोचले होते. याच काळात अवकाळी पावसासाठी अनुकूल स्थिती नव्हती. या अवकाळी पावसाचा शेतीला फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. तर मे महिन्यात होणाऱ्या अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील भाताच्या रोपांना किंवा उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वहंगामी कापूस लागवडीला फायदा होतो. तो अगदीच थोडा असतो.”
गेल्या मेमध्ये चांगला पाऊस
कृषी विभागाच्या पावसाच्या आकडेवारीवरूनही हे स्पष्ट होत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ७.७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ २.८ मिमी. झाला आहे. एप्रिल २०२१मध्ये १०.२, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ८.८ मिमी. तसेच मे २०२१मध्ये अवकाळीचे प्रमाण ५९.५ मिमी. होते. यंदा मात्र ते १३.४ मिमी.इतकेच आहे. यावरून अवकाळी पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे.
खरिपाची पूर्व मशागत करण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फायदा होतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन नांगरणी किंवा वखरणी करणे सोपे होते. यंदा मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाला नाही.
- संजय गाढे, वरिष्ठ व्यवस्थापक, अजित सीड्स, अकोला
यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फारसा फायदा होत नसला तरी पूर्वमशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक, बियाणे व निविष्ठा