Monsoon 2022| मान्सून आला पण पाऊस कुठाय? पेरण्या रखडल्याने शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:24 AM2022-06-16T10:24:34+5:302022-06-16T10:25:01+5:30
जूनअखेरीला वाढणार जोर
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार जूनमध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. सध्या मान्सूनने मराठवाड्यापर्यंत मजल मारली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसात सुमारे ३६ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या असून उडीद, मूग यासारख्या पिकांची लागवड आता करता येणार नाही. त्यामुळे हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकतोय का, असा सवाल आता शेतकरी करत आहेत.
राज्यात ११ जूनला मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याने कोकण व मध्य महाराष्ट्राचा काही भागही व्यापला. मात्र, विदर्भात अजूनही तो पोचलेला नाही. राज्यात खरिपाचे सर्वात जास्त क्षेत्र विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात असते. पहिल्या पावसावर अनेक शेतकरी उडीद, मूग यासारखे कमी कालावधीचे पीक घेतात. यंदा मात्र, मान्सून दाखल झाला असला तरी तो अपुरा झाला आहे. देशात १५ जूनपर्यंत सरासरी ५६.१ मिमी पाऊस होतो. यंदा तो केवळ ३५.७ मिमी झाला आहे. सरासरीच्या तुलनेत त्यात ३६ टक्क्यांची घट आहे.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरी पाऊस २०७ मिमी असताना २८३ मिमी इतका पाऊस झाला होता. यंदा मात्र, १५ जूनपर्यंत तो सुमारे १०३ मिमी अपेक्षित असताना केवळ ३७.२ मिमी इतका झाला आहे. पावसाच्या आगमनानंतर राज्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यात कापूस पिकाचे क्षेत्र जास्त आहे. पुरेसा पाऊस नसल्याने आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आहे. केवळ परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
पेरण्या करू नका
जूनच्या सुरुवातीला अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीची उडीद, मूग अशी पिके घेण्याचा कालावधी संपला आहे. शेतकऱ्यांनी त्याची लागवड करू नये. पेरणीयोग्य पाऊस अर्थात ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय उर्वरित पेरण्या करू नये, असा सल्ला कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिला.
दरवर्षीचेच चित्र
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “मान्सून मॉडेलनुसार काही वेळा मान्सून जोमदार असतो किंवा अशक्त असतो. यंदाही मॉडेलनुसार मान्सून योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यात कमतरता नाही. हे दरवर्षीचे होते. यंदा हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाला. त्यामुळे तो आता चांगला बरसेल असे सर्वांनी गृहीत धरले. मात्र, मान्सून सहसा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कमीच असतो. जूनअखेरीस तो सरासरी भरून काढतो. जुलै व ऑगस्टमध्ये तो चांगला पडतो.”
रविवारपासून पाऊस वाढणार
कोकण वगळता राज्यात शनिवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या रविवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात शुक्रवारी व शनिवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील पाऊस (स्रोत : कृषी विभाग)
वर्ष सरासरी प्रत्यक्ष (मिमी)
२०१७ २२३.३ २१९.१
२०१८ २२३.३ २३६.७
२०१९ २२३.३ १६०.३
२०२० २०७.६ २३५.१
२०२१ २०७.६ २८२. ७
१५ जून २०२२ १०३.८ ३७.२
हवामान विभागाचा अंदाज दरवर्षीच चुकतो. यंदाही चुकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. त्याचा फटका बसणार असून यापुढे अंदाज योग्य मिळाल्यास शेतकऱ्यांवर ही वेळ येणार नाही.
- विठ्ठल भोसले, शेतकरी, जडगाव ता. जि. औरंगाबाद