Monsoon 2022| मान्सूनने व्यापला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा बहुतांश भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 09:01 AM2022-06-14T09:01:16+5:302022-06-14T09:02:12+5:30
गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व तुरळक ठिकाणी मुसळधार...
पुणे : मान्सूनने सोमवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला आहे. येत्या बुधवारपर्यंत तो विदर्भाच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या चोवीस तासांत कोकण गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
सध्या मान्सूनची सीमा दीव, नंदुरबार, जळगाव, परभणी, बिदर, तिरुपती, पुदुच्चेरी अशी आहे. त्यामुळे मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरात राज्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाड्याचा व कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा व तमिळनाडूचा काही भाग व्यापलेला आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या चोवीस तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच जोराच्या पश्चिमी वाऱ्यांमुळे येत्या चार दिवसांत कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. पुणे शहरात येत्या चार दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे.