Monsoon 2023: देशातील ९० टक्के भागात मॉन्सूनची हजेरी; पुणे, मुंबईतही रविवारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:24 AM2023-06-26T10:24:08+5:302023-06-26T10:27:26+5:30
राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने रविवारी देशाचा ९० टक्के भाग व्यापला आहे. कमी वेळात अधिक भाग व्यापल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत मॉन्सून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाची पखरण झाल्याचे पहायला मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
कोकणात काही दिवसांपासून मॉन्सूनने आपला मुक्काम वाढविलेला होता. रविवारी मात्र मध्य महाराष्ट्रापासून ते जम्मू-काश्मिरपर्यंत मजल मारली. त्यामुळे देशभरातील ९० टक्के भागात मान्सून गेला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय राहण्याची चिन्हे वाढली असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात अलर्ट जारी
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये पुणे औरंगाबाद, सोलापूर, बीड, लातूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नागपूर, वर्धा, यवतमाळ, धुळे, अकोला, अमरावती, जालना यांचा समावेश आहे. येत्या दोन-तीन दिवसांत इथे जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सध्या मॉन्सून खूपच स्ट्रॉग असून, राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनने रविवारी महाराष्ट्र व्यापला आहे. एका दिवसात देशभरातील खूप मोठा भाग अतिशय वेगाने व्यापला आहे. मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. धरणक्षेत्र आणि घाट परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे.
- अनुपम कश्यपी, महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
राज्यातील पाऊस (मिमी)
पुणे : ६.४
कोल्हापूर : ०.९
महाबळेश्वर : ४३
सातारा : ४
सोलापूर : ६
मुंबई : ३४
रत्नागिरी : ४
औरंगाबाद : ०.५
परभणी : ०.२
बीड : ०.२
गोंदिया : २