पुण्यासह राज्यात पावसाला ‘अच्छे दिन’; हवामान खात्याचा अंदाज, घाट माथ्यावर रेड अलर्ट
By श्रीकिशन काळे | Published: July 13, 2024 04:57 PM2024-07-13T16:57:58+5:302024-07-13T17:00:38+5:30
मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरवात झाली आहे.
श्रीकिशन काळे, पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरूवात झाली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागातही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर आहे. त्यामुळे राज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधारचा इशारा देण्यात आला असून, इतर ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी कोसळतील. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला असून, सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर रेड अलर्ट आहे. तसेच सिंधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उद्या रविवारी (दि.१४) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट असून, रायगड, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. आज (दि.१३) आणि उद्या (दि.१४) ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही जिल्ह्यांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान पुणे शहरात शुक्रवारपासून (दि.१२) पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर पावसाची संततधार सुरू होती. ती शनिवारी दिवसभर सुरूच आहे. आकाश ढगाळ असून, मध्यम ते हलक्या सरींची बरसात होत आहे.