मॉन्सूनचा पुण्याला ‘बाय बाय’! महाराष्ट्रातही ४५ टक्के भागातून मॉन्सून परतला
By श्रीकिशन काळे | Published: October 6, 2023 03:56 PM2023-10-06T15:56:32+5:302023-10-06T15:56:49+5:30
ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला असून उष्णतेचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला
पुणे: मॉन्सून परतीच्या वाटेवर निघाला असून, महाराष्ट्रातून देखील तो आज जवळपास ४५ टक्के परतला आहे. पुणे, नागपूर येथून शुक्रवारी मॉन्सून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि छत्तीसगढ येथून निघून जाईल.
येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागातून मॉन्सून परत जाण्यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. आज पुणे, नागपूर, सटाणा, लखनऊ, परभणी, अलिबाग येथून मॉन्सून निघून गेला आहे. त्यामुळे राज्यात कोरडे हवामान तयार झाले आहे. उन्हाचा कडाका जाणवत असून, उकाडा वाढत आहे.
ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. उष्णतेचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांमधून मॉन्सून माघारी गेला आहे. तसेच गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून, कोकण आणि संपूर्ण उत्तर अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्राचा काही भाग येथून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.