मॉन्सून आला; पाऊस मात्र गायब
By admin | Published: June 14, 2015 12:21 AM2015-06-14T00:21:26+5:302015-06-14T00:21:26+5:30
पाच दिवस उशिरा दाखल झालेला मॉन्सून पुण्यात आता पाऊस पाडेल, अशी आशा घेऊन बसलेल्या पुणेकरांची मात्र आजही निराशा झाली.
पुणे : पाच दिवस उशिरा दाखल झालेला मॉन्सून पुण्यात आता पाऊस पाडेल, अशी आशा घेऊन बसलेल्या पुणेकरांची मात्र आजही निराशा झाली. आज दिवसभरात शहरात ढगाळ हवामान असूनही पाऊस मात्र पडलाच नाही. त्यामुळे पुण्यात मॉन्सून आला, पण पाऊस मात्र गायब अशी स्थिती झाली होती.
यंदा पुण्यात मॉन्सूनपूर्व म्हणजेच वळवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मॉन्सून पुण्यात दाखल होण्याअगोदर म्हणजेच १२ जूनअगोदर पुण्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. साधारणत: मॉन्सून ७ जूनला कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो आणि तो पहिल्याच टप्प्यात पुण्यातही येत असतो. मात्र यंदा मॉन्सूनला अनुकूल स्थिती नसल्याने तो ८ जूनला केवळ कोकणात दाखल झाला. त्यानंतर मात्र तब्बल ४ दिवसांनी तो पुण्यात दाखल झाला. काल मॉन्सून पुण्यात दाखल झाला, मात्र शहरात पाऊस पडला नाही. त्यामुळे आज तरी मॉन्सून पाऊस पाडेल, अशी आशा पुणेकरांना होती.