विलंबाने सुरु झालेली परती; अंदाजापेक्षा आॅगस्टमध्ये कमी पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:15 PM2017-10-12T15:15:27+5:302017-10-12T15:32:53+5:30
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाचा अहवाल हवामान विभागाने जाहीर केला आहे़ हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सूनचे केरळला वेळेवर आगमन झाले होते़ पण, त्यानंतर त्याचे वितरण असमान राहिले़
पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या प्रमाणात झालेली घट, मॉन्सूनच्या परतीला तीन आठवडे विलंबाने सुरुवात, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा आॅगस्टमध्ये कमी झालेला पाऊस आणि त्यामुळे धान्याचे कोठार असलेल्या उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस हे यंदाच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य ठरले आहे़
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाचा अहवाल हवामान विभागाने जाहीर केला आहे़ हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सूनचे केरळला वेळेवर आगमन झाले होते़ पण, त्यानंतर त्याचे वितरण असमान राहिले़
देशभरातील चार महिन्यांचा एकूण पाऊस पाहता हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे देशभरात ९५ टक्के पाऊस पडला आहे़ हवामान विभागाने ६ जूनला देशभरात ९८ टक्के पाऊस पडेल व त्यात ४ टक्क्यांचा कमी किंवा जास्तीचा फरक पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात ९५ टक्के पाऊस पडला़ जुलैमध्ये ९६+_९टक्के (अधिक अथवा कमी) तसेच आॅगस्टमध्ये ९९+_९ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ पण, प्रत्यक्षात जुलैमध्ये १०२ टक्के तर आॅगस्टमध्ये ८७ टक्के पाऊस पडला़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये देशभरात १०० +_ ८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने ८ आॅगस्ट रोजी व्यक्त केला होता़ पंरतु, प्रत्यक्षात केवळ ८७ टक्के पाऊस पडला़ संपूर्ण देशभरात ५ टक्के पाऊस कमी होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी झालेला पाऊस होय़
पावसाळ्याच्या चार महिन्यात दरवर्षी साधारणपणे ६ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि ८ कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असतात़ यंदाही १४ वेळा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असले तरी त्यात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र केवळ जूनमध्ये एकदाच निर्माण झाले़ तर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन महिन्यात निर्माण झाले नाही़ जून व जुलैमध्ये एकूण ५ वेळा द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे जून, जुलैमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये केवळ ३ वेळा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़ त्याचा परिणाम उत्तर भारतात या दोन महिन्यात पाऊसमान कमी राहिले़
देशाच्या ३६ हवामान विभागापैकी २५ विभागात आणि देशात ६५ टक्के क्षेत्रात सर्वसाधारण पाऊस झाला असला तरी ११ विभागात तो सरासरीपेक्षा कमी आहे़ देशातील ५ विभागात आणि एकूण क्षेत्रफळाच्या १७ टक्के परिसरात सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर ६ विभागा आणि १७ टक्के क्षेत्रफळावर सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे़ त्यात विदर्भ, पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश यांचा समावेश आहे़