पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे हटवणार

By admin | Published: May 7, 2017 02:29 AM2017-05-07T02:29:57+5:302017-05-07T02:29:57+5:30

आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर

Before the monsoon, the encroachment will be removed | पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे हटवणार

पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे हटवणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी वन, महसूल, पोलीस विभाग यांचा एकत्रित कृती अराखडा तयार केला जाईल व पावसाळ्यापूर्वी ही सर्व अतिक्रमणे काढली जातील, असा निर्णय खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थित लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
लोकशासन आंदोलकांनी वनजमिनीवर केलेले अतिक्रमण व २ जुलै रोजी ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम या विषयांवर लांडेवाडी येथे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सुनील गाडे, सहायक उपवनसंरक्षक डी. जे. घाडगे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, प्रजोद पालवे, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर आदी उपस्थित होते.
काही लोकांनी बेकायदेशीरपणे चळवळ उभारून वनजमिनींचा ताबा घेतला आहे. या लोकांनी ३ तालुक्यांतील २०० एकरांपेक्षा जास्त जमिनींचा ताबा घेऊन झाडे तोडली, जमिनीचे सपाटीकरण केले आहे. याकडे शासनाचे लक्ष नसून, ही बाब केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने घ्यावी, यासाठी खासदार आढळराव-पाटील यांनी लोकसभेतही आवाज उठवला आहे.
ही अतिक्रमणे काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वन, महसूल, पोलीस या विभागांनी कायदेशीररीत्या या लोकांना बाहेर काढण्यासाठी कृती अराखडा तयार करावा व पावसाळ्यापूर्वी या जागा मोकळया कराव्यात, अशी सूचना आढळराव-पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे कृती अराखडा तयार करण्याचे ठरले असून, त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे.


जुन्नर : साडेतीन लाख झाडे लावणार

२ जुलै रोजी राज्यात ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. यापैकी जुन्नर वन विभागात ३ लाख ६६ हजार झाडे लावली जाणार असून, आंबेगाव तालुक्यात १ लाख ३८ हजार झाडे लावली जाणार आहेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांबरोबर ग्रामस्थांनीदेखील यामध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी हा कार्यक्रम पोहोचवला जाणार असल्याचे अर्जुन म्हसे-पाटील यांनी सांगितले. तसेच, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ८ मे रोजी असलेल्या वाढदिवशी एक हजार झाडे लावली जाणार आहेत. यापैकी ६१ झाडे खासदारांच्या हस्तेलावण्यात येणार असल्याचे रवींद्र करंजखिले यांनी सांगितले.

Web Title: Before the monsoon, the encroachment will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.