मान्सून १७ जूनपर्यंत लांबणीवर, मुहूर्त गेला आणखी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:30 AM2019-05-28T06:30:07+5:302019-05-28T06:30:36+5:30

सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे.

The monsoon has long been deferred till June 17, even further | मान्सून १७ जूनपर्यंत लांबणीवर, मुहूर्त गेला आणखी पुढे

मान्सून १७ जूनपर्यंत लांबणीवर, मुहूर्त गेला आणखी पुढे

Next

पुणे : सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात १७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा २०-३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाईदेखील करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. मात्र, त्यापुढील वाटचाल झाली नव्हती. मान्सून दाखल होऊन त्याची पुढील वाटचाल कशी होते, हे महत्त्वाचे आहे. यंदा किनारपट्टी भागातच मान्सून पाच ते सहा दिवस उशिरा दाखल होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे त्याचे राज्यातील आगमनही आणखी लांबेल, असे दिसते.
दोन वर्षे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. यंदा राज्यात टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय चारा छावण्या उभारण्याची वेळही आली.
कुलकर्णी म्हणाले, मान्सूनची प्रगती अत्यंत धिम्या गतीने होत आहे. पाऊस झाल्यास तो १ सेंटीमीटरच्या आसपास राहील. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठीदेखील उपयुक्त नाही. जूनमध्ये पाऊस होणार नसल्याने धरणसाठ्याचे नियोजन केले पाहिजे.
>पावसाला उशीर होण्याची कारणे काय?
एल निनोची स्थिती सामान्य आहे. मान्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २८ ते २९ डिग्री असते. हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान १ अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान एक अंशाने जास्त असावे लागते. मान्सून पुढे जाण्यासाठी वाºयाचा वेगही योग्य असावा लागतो. आत्ता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमधे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
- जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ज्ञ

 

Web Title: The monsoon has long been deferred till June 17, even further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस