मॉन्सूनचा श्रीलंकेतच मुक्काम ! दोन दिवसांत पुढील प्रवास होणार
By श्रीकिशन काळे | Published: May 23, 2024 04:24 PM2024-05-23T16:24:30+5:302024-05-23T16:29:30+5:30
सध्या मॉन्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून, तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला आहे.
श्रीकिशन काळे,लोकमत न्यूज नेटवर्क,पुणे : सध्या मॉन्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून, तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला आहे. पुढील प्रवास दोन दिवसांमध्ये करेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस दुपारी उष्णता आणि सायंकाळी पाऊस अशी स्थिती राहील, असेही सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनूसार मॉन्सूनने बुधवारी (दि.२२) दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. त्यानंतर तो तिथेच स्थिरावला आहे. मॉन्सूनमध्ये अद्याप तरी प्रगती झालेली दिसून येत नाही. परंतु, माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. पुढील २ दिवसांमध्ये मॉन्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा काही भाग, अंदमान आणि निकोबारचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र, श्रीलंकेचा काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, देशात विदर्भ, मराठवाडा आणि इतर काही भागात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी तर देशामधील सर्वाधिक कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान राजस्थानमधील बारमेरमध्ये होते. तसेच अनेक भागामध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले.