Monsoon Update: मान्सून परतीचा प्रवास सुरु; राजस्थानमध्ये अडकणार
By नितीन चौधरी | Published: September 20, 2022 07:03 PM2022-09-20T19:03:26+5:302022-09-20T19:16:08+5:30
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आजपासून ढगाळ वातावरण राहून पाऊस वाढणार
पुणे : मॉन्सूनच्या परतीचा अधिकृत प्रवास मंगळवारपासून (ता. २०) सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सुरू केल्याचे जाहीर केले. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी परतीचा मॉन्सून राजस्थानमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मॉन्सूनचा परतीचा प्रसाव शक्यतो १७ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होतो. यंदाही त्याचा हा प्रवास २० तारखेला अर्थात मंगळवारी सुरू झाल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “मॉन्सूनचा हा प्रवास संथगतीने सुरू झाला आहे. दक्षिण पश्चिम राजस्थानमध्ये त्याच्या परतीला प्रवासाला अनुकुल हवामान तयार झाल्याने तसे जाहीर करण्यात आले आहे. सध्या परतीच्या मॉन्सूनची रेषा ही खाजुवाला, बिकानेर, जोधपूर, नालिया अशी तयार झाली आहे. मात्र, त्याच वेळी बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य प्रदेश व पूर्व राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हा परतीचा प्रवास त्यानंतरचे तीन दिवस होणार नाही. कमी दाबाचा पट्टा निवळल्यावर तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.”
पुढील तीन दिवस पाऊस
उत्तर-पश्चिम आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, छत्तीसगडमार्गे वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांत पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आजपासून ढगाळ वातावरण राहून पाऊस वाढेल. पुण्यासह उत्तर-मध्य मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पुणे शहरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहून दुपारी किंवा संध्याकाळ मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्याचे काश्यपी यांनी स्पष्ट केले.