मान्सूनचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:47+5:302021-05-16T04:09:47+5:30
मान्सून हा नेहमीच बहुतांश लोकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. हजारो वर्षांपासून नियमितपणे मान्सूनचा पाऊस येत असला, तरी त्याची अनिश्चितता ...
मान्सून हा नेहमीच बहुतांश लोकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. हजारो वर्षांपासून नियमितपणे मान्सूनचा पाऊस येत असला, तरी त्याची अनिश्चितता अजूनही कायम आहे. असे असले तरी तो नियमितपणे येतो. फक्त त्याची येण्याची वेळ कधी असेल व तो किती बरसेल? याविषयी आता अत्याधुनिक मॉडेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य होऊ लागले आहे.
गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणात हाहाकार माजविला होता. या चक्रीवादळाचा परिणाम होऊन राज्यात मान्सूनच्या आगमनाला काहीसा उशीर झाला होता. यंदाही अरबी समुद्रात ताैक्ते चक्रीवादळ आले आहे. त्यामुळे यंदाही राज्यात मान्सून येण्यास उशीर होईल की तो लवकर दाखल होईल, याविषयी चर्चा सुरू झालेली दिसते. भारतीय उपखंडात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ९० टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनच्या वाऱ्यामुळे मिळत असल्याने मान्सूनचे आगमन त्याचे स्थिरावणे आणि त्याचे वितरण हे देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते.
भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांच्या निरीक्षणातून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मान्सूनचे वारे सर्वप्रथम २० मेच्या आसपास अंदमान परिसरात दाखल होतात. तेथून तो साधारण १ जूनला केरळला भारतीय उपखंडाच्या भूमीवर सर्वप्रथम दाखल होतो. त्यावेळी तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत जातो. ५ जूनपर्यंत कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यात दाखल होतो. नंतर तो प्रवास करीत १० जूनच्या आसपास महाराष्ट्र, छत्तीसगड, प़ बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशाच्या काही भागात प्रवेश करतो. १ जुलैला उर्वरित राजस्थानसह काश्मीरमध्ये दाखल होतो. अनेकदा या तारखांमध्ये थोडे फार बदल होत जातात.
हवामान शास्त्रज्ञांनी १९७१ ते २०१९ पर्यंत प्रत्येक ठिकाणी मान्सून दाखल झालेल्या तारखांचा अभ्यास करुन गेल्या वर्षी मान्सूनच्या आगमन व परतीचा अभ्यास करून नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या नव्या तारखांनुसार आता मान्सूनचा अंदाज वर्तविला जाणार आहे.
त्यात केरळमधील १ जूनला मान्सूनच्या आगमनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. नव्या तारखांनुसार काही ठिकाणी एक दिवस, तर काही ठिकाणी ३ ते ४ दिवसांने मान्सूनचे आगमन लांबणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन गोवा व दक्षिण कोकणात ७ जून रोजी होणार आहे. मात्र, कोल्हापूरपासून मुंबईपर्यंतचे आगमन एक दिवस उशिरा होणार आहे. नागपूरमध्ये २ दिवस तर, जळगावमध्ये ५ दिवस उशिराने आगमन होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात जुन्या तारखांनुसार आता ३ ते ७ दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याचवेळी दिल्लीत मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. तसेच चंदीगड, हरियानामध्ये ते नेहमीपेक्षा उशिरा होणार. सर्वात शेवटी राजस्थानमध्ये मान्सून पोहोचतो. पण, आता नेहमीपेक्षा तो २ ते ३ दिवस लवकर पोहोचणार आहे. श्रीनगरमध्ये ५ जुलैऐवजी २८ जूनला मान्सून पोहोचणार आहे. या नव्या तारखांनुसार आता आपल्याला मान्सून लवकर आला की उशिरा हे समजणार आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या तारखा
ठिकाण नव्या तारखाजुन्या तारखा
दक्षिण कोकण७ जून ७ जून
कोल्हापूर ९ जून ९ जून
सातारा १० जून ९ जून
पुणे १० जून ९ जून
मुंबई ११ जून १०जून
अहमदनगर १२ जून १० जून
परभणी १३ जून ९ जून
जळगाव १८ जून १३ जून
नागपूर १५ जून १३ जून
अकोला १५ जून ८ जून