Monsoon Update 2024: कोकण, मराठवाड्यात 'येलो अलर्ट'चा इशारा; पूर्व विदर्भाला मान्सूनची प्रतीक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 09:22 AM2024-06-17T09:22:39+5:302024-06-17T09:24:13+5:30
दरम्यान, पुणे शहरात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे. दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.... (Monsson updates, Maharashtra Monsoon, Monsoon Rain in Maharashtra, Monsoon news)
पुणे : मान्सूनच्या वाटचालीमध्ये रविवारी काहीच प्रगती झालेली नाही. विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मात्र पाऊस होत आहे. त्याचाही जोर कमी झाला असून, काही भागांत मात्र वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुणे शहरात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे. दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.
सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. खानदेश आणि पूर्व विदर्भात मान्सून पावसाची प्रतीक्षा आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी येलो अलर्ट दिला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही येलो अलर्ट आहे.
राज्यात पावसाची विश्रांती
रविवारी राज्यामध्ये दोन-तीन जिल्हे सोडले, तर पावसाने विश्रांती घेतली. केवळ बीड, कोल्हापूर या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बीडमध्ये ४ मिमी, तर कोल्हापूरला २ मिमी पावसाची नोंद झाली.
सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीही हालचाल नाही. मध्य भारतामध्येदेखील मान्सून मंदावलेला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. घाटमाथ्यावर मात्र जोरदार पाऊस होऊ शकतो.
- डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे