मान्सून १० जूनपर्यंत राज्य व्यापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:45 PM2018-06-01T21:45:49+5:302018-06-01T21:45:49+5:30
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हवामानाचा १० दिवसापर्यंतचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे.
पुणे : हवामानाच्या लघु आणि मध्यमकालीन अंदाजात आणखी सुधारणा करण्यासाठी पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने भूखंडीय हवामान अंदाज प्रणाली (एन्सेम्बल प्रिडीक्शन सिस्टीम) आणली आहे. त्यानुसार ८ ते १० जून पर्यंत राज्य मान्सून व्यापेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हवामानाचा १० दिवसापर्यंतचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. पुण्यातील भारतीय उष्णकटीय हवामान विज्ञान विभाग (आयआयटीएम), नोएडातील राष्ट्रीय मध्यम अवधी हवामान अंदाज केंद्र (एनसीएमआरडब्लूएफ) आणि भारतीय हवामान विज्ञान विभागातील संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे. जगभरातील काही निवडक देशांमध्ये हवामानाचा लघु आणि मध्यम कालावधीचा अंदाज वर्तविण्याची प्रणाली आहे. या प्रणालीमुळे लघु-मध्यम काळातील अंदाजात अधिक सुधारणा होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अधिक चांगला निर्णय घेण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
या प्रणालीमुळे हवामानाच्या घटकांतील लहानश बदलांच्या देखील उच्चस्तरीय प्रतिमा मिळविणे शक्य झाले आहे. त्याचा उपयोग कृषी, जलसंवर्धन, पर्यजन, ऊर्जा तसेच अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी होईल. हवामान विभागाने या प्रणालीनुसार दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगितले आहे. येत्या ११ जून पर्यंतचा अंदाज दिला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्य ५ जून पर्यंत मान्सून सर्वदूर पोहोचेल. तर, महाराष्ट्रात ८ ते १० जून दरम्यान मान्सून व्यापेल असे सांगण्यात आले आहे.