मान्सून जोर धरणार, पाच दिवसांतच राज्य व्यापणार; कोकणात जोरदार पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:59 AM2024-06-21T09:59:43+5:302024-06-21T10:02:05+5:30
हवामान विभागाने कोकणात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे...
पुणे : पश्चिम विदर्भात सुमारे आठवड्याहून अधिक काळ रेंगाळलेल्या मान्सूनने आता पूर्व विदर्भातही हजेरी लावली असून, अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेनेही जोर पकडला आहे. परिणामी राज्यात येत्या पाच दिवसांत मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे हवामान विभागाने कोकणात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातही २४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नव्हती. त्याचप्रमाणे त्याच्या प्रवाहातही जोर नसल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या होत्या. राज्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे तयार झालेल्या स्थितीमुळे पाऊस पडत होता. मात्र, त्याचा इतरत्र जोर नव्हता. त्यानंतर गुरूवारी (दि. २०) मान्सूनने पूर्व विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा, वायव्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन परिसर आणि बिहारच्या काही भागात हजेरी लावली आहे.
कर्नाटक, केरळ भागात कमी दाबाचा पट्टा
सध्या आसाम आणि शेजारच्या भागात चक्रवात सक्रिय असून, दुसरे चक्रवात बिहार आणि शेजारच्या खालच्या उष्णकटिबंधीय पातळीमध्ये सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत खालच्या उष्णकटिबंधीय पातळीवर जोरदार नैऋत्य व पश्चिमी वारे वाहत आहेत. तर अरबी समुद्रातील मान्सूनची शाखाही जोर धरत आहे. कर्नाटक आणि केरळ किनाऱ्यापासून सरासरी समुद्रसपाटीपासून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, राज्यात पुढील पाच दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत काही ठिकाणी पाऊस
पुढील तीन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाडा व विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज
मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात रविवारपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत गुरूवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस
पुणे ४.५
कोल्हापूर ६
महाबळेश्वर ४४
सातारा १२
अलिबाग ६६
संभाजीनगर ७
बुलढाणा २
अमरावती १३
चंद्रपूर ४