मान्सून उशिरा परतणार, ३० तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:32 PM2022-09-25T12:32:41+5:302022-09-25T12:32:45+5:30
हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.
पुणे : राज्याच्या काही भागांत ३० सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होईल. हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास २० सप्टेंबरला राजस्थानातून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही प्रगती गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवसात राजस्थान, हरयाणा, चंडीगड, दिल्ली आणि पंजाबमध्ये पाऊस पडेल.
राज्यात मान्सूनची माघार साधारणपणे ३ ते ४ ऑक्टोबरपासून सुरू होते; परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अंदाजात पावसाची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास ५ ते ६ दिवसांनी उशिरा होऊ शकतो.
डॉ. अनुप काश्यपी,
प्रमुख,हवामान अंदाज विभाग