Monsson 2023: पुण्यात वरुणराजाचे आगमन; शहरासह उपनगरांत पावसाच्या सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:07 AM2023-06-24T11:07:57+5:302023-06-24T11:13:13+5:30
काल मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती....
पुणे : अखेर जून महिन्याच्या शेवटी पुण्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज (२४ जून) सकाळपासूनच पुणे शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांत पावसाच्या सरी आल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. तर काही भागांंत जोरदार पाऊस झाला आहे. काल मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती.
यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे जून महिन्यातील सरासरी पावसाची नोंद झालेली नाही. जून महिन्यात सरासरी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ २०.७ मिमीची नोंद झाली होती. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने पुणेकर हैराण होते. पण आता अखेर शहरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाल्याने पुणेकर सुखावले आहेत.
हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येणार असल्याचा अंदाज दिला होता. पण, एवढा उशीर करेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत अनेकदा सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाचा दिलासा, अशी स्थिती पुणेकरांनी अनुभवली. तापमानाचा पाराही चाळिशीच्या पार पोहोचला होता. जूनमध्ये साधारणपणे शंभर ते दीडशे मिमीच्या दरम्यान पावसाची सरासरी असते. यंदा मात्र विदारक चित्र आहे.
स्थानिक हवामानही बदलतेय :
पुणे जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दरवर्षीच्या पावसाची सरासरी साधारणपणे १२०८ मिमी होती. गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल झाला आहे. आता ७५० ते ८०० मिमी पाऊस सरासरी पडतो. हवामान बदलाचा हा परिणाम असू शकतो. पुण्याच्या तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. एरवी चाळिशी पार न जाणारे तापमान आता सर्रास ४० पार जात आहे.
मृग नक्षत्र कोरडेच !
दरवर्षी ७ जूनला मृग नक्षत्र असते. तेव्हा झालेला पाऊस हा अतिशय चांगला असतो. पावसाळ्यातील हे पहिले नक्षत्र आहे. शेतकऱ्यांना या मृगाची आस लागलेली असते. या नक्षत्रात पाऊस झाला की, पेरण्या केल्या जातात. पण, यंदा ते कोरडेच जात आहे. आता सर्वांचे लक्ष २१ जून रोजीच्या आर्द्रा नक्षत्रावर आहे.