कचरा डेपोचे आंदोलन एक महिना पुढे, फुरसुंगी ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:23 AM2018-04-20T03:23:52+5:302018-04-20T03:23:52+5:30
महापालिकेकडून फुरसुंगी गावात प्रस्तावित केलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामुळे शुक्रवार (दि.२०) पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन फुरसुंगी ग्रामस्थांनी एक महिनाभर पुढे ढकलले आहे.
पुणे : महापालिकेकडून फुरसुंगी गावात प्रस्तावित केलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामुळे शुक्रवार (दि.२०) पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन फुरसुंगी ग्रामस्थांनी एक महिनाभर पुढे ढकलले आहे. फुरसुंगी ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे नवनियुक्त आयुक्तांचे विघ्न मात्र सध्या तरी टळले आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांचे महापालिकेतील स्वागत कचऱ्यानेच झाले होते. त्यानंतर शहरातील कचरा चांगलाच पडला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे ऐन उन्हाळ्यात शहराचा कचरा प्रश्न चांगलाच पेटायचा; परंतु आठ महिन्यांपूर्वीच फुरसुंगी ग्रामपंचायतीचा महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. यामुळे आता शहराचा कचराप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रशासनाला वाटले होते; परंतु फुरसुंगी गावाचा महापालिकेत समावेश होऊन देखील प्रशासनाकडून गावातील पायभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत ग्रामस्थांनी पुन्हा डेपोत कचरा टाकू न देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामस्थांनी २० एप्रिल पासून महापालिकेच्या कचºयांच्या गाड्या डेपोत येऊ न देण्याचा
इशारा दिला होता. त्यामुळे या उन्हाळ्यातदेखील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता
निर्माण झाली होती.
गावातील कामांबाबत अनेकदा चर्चा झाली आहे; परंतु कामे होत नाहीत. त्याबाबत महापौर आणि आयुक्तांसोबत समाधानकारक चर्चा आहे. येत्या महिनाभरात कामे करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थ-अधिकाºयांची बैठक
ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत फुरसुंगीतील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक झाली. पायाभूत सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी लावून धरला होता. याबाबत घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले, ग्रामस्थांच्या मागण्यानुसार कामे करण्यात येणार आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे
आंदोलन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कचरा वाहतूक सुरू राहील.