दीड महिना एकटाच लढतोय गाव पाणीदार करण्यासाठी!

By admin | Published: May 23, 2017 05:31 AM2017-05-23T05:31:30+5:302017-05-23T05:31:30+5:30

दररोज सकाळी-संध्याकाळी २ तास श्रमदान केले... गेला दीड महिना सुमारे ४०० मीटरचा सलग समतल चर खोदला... एका पावसात सुमारे १३ हजार लिटर पाणीसाठा होईल

A month and a half to fight the village! | दीड महिना एकटाच लढतोय गाव पाणीदार करण्यासाठी!

दीड महिना एकटाच लढतोय गाव पाणीदार करण्यासाठी!

Next

बाळासाहेब काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : दररोज सकाळी-संध्याकाळी २ तास श्रमदान केले... गेला दीड महिना सुमारे ४०० मीटरचा सलग समतल चर खोदला... एका पावसात सुमारे १३ हजार लिटर पाणीसाठा होईल एवढे काम केले... हे काम कोणत्या गावाने नव्हे, तर ७४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने केले. त्यांचे नाव आहे तुकाराम गणपत जगताप.
पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथील हे शेतकरी आहेत. ४०० मीटरचा सलग समतल चर खोदून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत आपल्या गावाचा सहभाग नोंदवला आहे. गावातील कोणीही त्यांना साथ दिली नसली, तरीही त्यांनी जिद्दीने हे काम केले.
या परिसरात पावसाचे प्रमाण चांगले आहे. पावसाळ्यात जर दहा वेळा पाऊस पडला, तर सुमारे सव्वा लाख लिटर पाणी या सलग चरातून जमिनीत मुरू शकेल एवढे मोठे काम उभे केले आहे. यातून त्यांच्या उत्तुंग ध्येयासक्तीचे दर्शन घडले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आणि पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुरेश सस्ते व त्यांचे सहकारी आदींनी त्यांच्या कामाला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केलेच; शिवाय त्यांच्याबरोबरीने काही वेळ श्रमदान करून या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाला सलाम केला आहे.
पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील ३३ गावे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
सुपे खुर्द येथील येथील शेतकरी तुकाराम गणपत जगताप यांच्यासह तिघांनी पाणी फाउंडेशनमार्फत सातारा जिल्ह्यातील अनपटवाडी (ता. कोरेगाव) येथे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणांनंतर गावात येऊन पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावाने सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, गावातील कोणीही त्यांना साथ दिली नाही. सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या सहकाऱ्यांनीही साथ सोडली. शेवटी एकट्यानेच त्यांनी या कामाला सुरुवात केली. स्पर्धा सुरू झाल्यापासून आजअखेर स्पर्धेचा कालावधी संपेपर्यंत त्यांनी सकाळी-संध्याकाळी दररोज दोन तास श्रमदान करून जिद्दीचे दर्शन घडविले आहे.

Web Title: A month and a half to fight the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.