केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात एक महिन्याच्या संपाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:22 PM2019-08-20T19:22:55+5:302019-08-20T19:28:39+5:30
दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असून सरकार या कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे..
देहूरोड : केंद्र सरकारने देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांचे (ऑर्डनन्स फॅक्टरीज) खासगीकरण करण्याचे धोरण निश्चित करत आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात गेले महिनाभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयुध निमार्णीतील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने विविध मार्गांनी आंदोलने केली. मात्र, सरकारने दखल न घेतल्याने मंगळवारी सकाळपासून एक महिन्याचा संपाला सुरुवात केली आहे. संपात देहूरोड येथील आयुध निर्माणातील(ऑर्डनन्स फॅक्टरी) सर्व कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे.
देशातील ऑर्डनन्स फॅक्टरी बोडार्अंतर्गत संपूर्ण देशात एकूण ४१ दारूगोळा निर्मिती कारखाने आहेत. यात सुमारे पाच लाख कर्मचारी कार्यरत असून या कारखान्यांमध्ये दारूगोळा व शस्त्रास्त्रांबरोबरच संरक्षण मंत्रालयासाठी आवश्यक विविध उत्पादनांचे उत्पादन घेण्यात येते. दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असून सरकार या कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. विविध शस्रास्त्रे निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे महामंडळात रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे. एकीकडे सरकार 'मेक इन इंडिया'ची भाषा करत असून दुसरीकडे कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. अर्थसंकल्पात ऑर्डनन्स फॅक्टरीजसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून सरकारच्या निर्णयाविरोधात एक महिन्याच्या संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी देहूरोड येथील आयुध निर्माणच्या सर्व कामगार संघटनाच्या सदस्य कामगारांनी संपात सहभाग घेत सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला आहे. संपात इंटक, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, टीयुसीसी, जेडब्लूएम , एआयएएनजीओ व पॅरामेडिकल असोसिएशन या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले आहेत. संप सकाळपासून शांततेत सुरु असून पुढील एक महिना संप सुरु ठेवण्यात येणार असल्याचे कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान एक महिन्याच्या संपाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.