मे महिन्यात हवेलीत प्रति माणशी दहा किलो धान्याचे मोफत वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:31+5:302021-05-11T04:11:31+5:30
हवेलीमध्ये मोफत अन्न धान्याचे वाटप हे ८१ रास्तभाव दुकानातून होणार असून, मे व जून या महिन्यांसाठी हे वाटप असल्याची ...
हवेलीमध्ये मोफत अन्न धान्याचे वाटप हे ८१ रास्तभाव दुकानातून होणार असून, मे व जून या महिन्यांसाठी हे वाटप असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.यावेळी तहसीलदार सुनील कोळी व अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, महसूल नायब तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते.
सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मे २०२१ मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा कार्डधारकास मोफत धान्य वाटप करणेबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे. यामधील पात्र लाभार्थ्यांना प्रति माणशी सहा किलो गहू व चार किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
मे २०२१ करिता मुख्यमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २४८.८५० मेट्रिक टन गहू व १६६ मेट्रिक टन तांदूळ तसेच अंत्योदय योजने अंतर्गत ४९.५० क्विंटल गहू व १९.५० क्विंटल तांदूळ वाटपासाठी हवेली तालुक्यातील रास्तभाव दुकानदार यांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
मे व जून २०२१ करिता पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार मे २०२१ करीता २४४ मेट्रिक टन गहू व १५२ मेट्रिक टन तांदूळ तसेच अंत्योदय योजने अंतर्गत २ मेट्रिक टन गहू व १ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन प्राप्त झाल्याची माहिती तालुका पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.
--
कोट -१
हवेलीत अन्नसुरक्षेचे एकूण कार्ड संख्या १९ हजार असून अन्न सुरक्षा लाभार्थी संख्या ८४ हजार ६९४ आहे.२०० अंत्योदय कार्ड संख्या असून यामधील लाभार्थी संख्या ५७६ आहे.दुकानदारांना मोफत धान्य वाटपासाठी सूचना दिलेल्या आहेत दुकानांमधून धान्याचे वितरण सुलभ होणेसाठी मंडलाधिकारी,तलाठी, शिक्षक, स्थानिक ग्रामसुरक्षा दल यांनाही कळवले आहे. नागरिकांच्या धान्य वाटपाबाबत काही तक्रारी आलेस संबधित दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून मोफत धान्य वाटपासाठी सहकार्य करावयाचे आहे.
संजय भोसले, महसूल नायब तहसीलदार