महिनाभर ‘खिचडी’त तूरडाळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:12 AM2018-07-22T03:12:32+5:302018-07-22T03:12:59+5:30
पोषण आहार अधीक्षकांची शिक्षण समितीत तक्रार
पुणे : एकीकडे तूरडाळीचे उत्पादन वाढल्याचे अन्नधान्य पुरवठामंत्र्यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र, जिल्ह्यात पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणाऱ्या तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार सर्व तालुक्यांतील शालेय पोषण आहार अधीक्षकांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत केली आहे. गेल्या जूनपासून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याने पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी तूरडाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन झाल्याने डाळ कमी पडणार नाही, अशी माहिती अन्न व पुरवठा मंत्र्यांनी केले होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार शिजवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून डाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार अधीक्षकांनी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे केल्या. गेल्या वर्षी तूरडाळीचा पुरवठा हा शासकीय संस्थेमार्फत करण्यात यावा, असे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ठरले होते. त्यानुसार शिक्षण संचालनालयाने काढलेल्या निविदेनुसार संपूर्ण जिल्ह्यातला मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. तर्फे तूरडाळीचा पुरवठा केला जातो. मात्र, या फेडरेशनकडून गेल्या महिनाभरापासून अनियमित पुरवठा सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांपर्यंत मागणी करूनही डाळ पोहोचली नसल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून कुठला आहार दिला जावा, याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यात तूरडाळीचा प्राधान्याने समावेश आहे. आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी, आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या जेवणात तूरडाळीचा समावेश आहे. यात डाळीचे वरण, सांबार, भात, आमटी भात दिला जावा, अशा सूचना शासनाच्या आहेत. मात्र, डाळींचा पुरवठाच होत नसल्याने या दिवशी काय शिजवावे,हा प्रश्न शालेय पोषण आहार अधीक्षकांना पडला आहे.
आठवड्याच्या इतर दिवशी वाटाणा वापरून भात, कडधान्यांची उसळ, भाजी आणि आमटी दिली जाते. गुरुवारी मटकी वापरून भात, कडधान्य उसळ, भाजी आमटी तसेच मटकी डाळ दिली जाते तर शनिवारी मुगडाळ, आमटी भात असे पोषण आहाराचे नियोजन आहे.
पोषण आहारात डाळीबरोबर वाटाणा, मूग, मटकी, तेल, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, जीरे, मोहरी आणि मिरचीचाही पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट मुंबईतील महाराष्ट्र को आॅपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनतर्फे या सर्वांचा पुरवठा केला जातो.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत तूरडाळीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार जिल्ह्यातील तालुका पोषण आहार अधीक्षकांनी केली. याची माहिती घेतली असता गेल्या महिन्याभरापासून तुरडाळीचा पुरवठा होत नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत डाळ पुरविणाºया संस्थेशी संपर्क साधला असून त्यांना पुरवठा होत नसल्याबाबत कारणे विचारण्यात आली आहे. तसेच लवकरच डाळीचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून लवकरच पुरवठा व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.
- विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद