घरपट्टीचा मासिक २ टक्के दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:55 AM2018-06-24T03:55:22+5:302018-06-24T03:55:25+5:30
महापालिकेच्या मिळकत कराची (घरपट्टी) पहिल्या २ महिन्यांची सवलत संपल्यानंतर लगेचच आता पहिल्या सहामाहीसाठीचा मासिक २ टक्के दंड आकारणे सुरू होणार आहे.
पुणे : महापालिकेच्या मिळकत कराची (घरपट्टी) पहिल्या २ महिन्यांची सवलत संपल्यानंतर लगेचच आता पहिल्या सहामाहीसाठीचा मासिक २ टक्के दंड आकारणे सुरू होणार आहे. त्यापुढच्या सहा महिन्यांसाठीही पहिला महिना संपताच लगेचच मासिक २ टक्के दंड आकारण्यास सुरूवात केली जाते. सावकारी टक्क्यांपेक्षाही ही टक्केवारी जास्त असल्याची टीका यावरून केली जात असते.
महापालिकेकडून आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान वर्षासाठी म्हणून मिळकत कर आकारला जातो. शहरात अशा नोंदणीकृत मालमत्तांची संख्या ८ लाख ४२ हजार इतकी आहे. दोन सहामाहीत ही कर आकारणी केली जाते.
पहिल्या सहा महिन्यातील एप्रिल व मे या दोन महिन्यात कर जमा केला तर सुरूवातीला १० टक्के व नंतर ५ टक्के सवलत करपात्र रकमेवर दिली जाते. हे दोन महिने पुर्ण झाल्यानंतर पुढच्या ४ महिन्यांसाठी दरमहा २ टक्के या दराने दंडआकारणी कराच्या रकमेवर केली जाते. या सहा महिन्याच्या अखेरीस कर जमा केला तर करदात्याला केवळ विलंबापोटी मुळ रकमेवर एकूण ८ टक्के दंड जमा करावा लागतो.
हीच पद्धत दुसऱ्या सहा महिन्यांसाठीही वापरली जाते. त्यात पहिल्या सहा महिन्यांचे पैसे जमा केले नाही तर त्याचा पुढील महिन्यांसाठीही २ टक्के दंड आकारला जातोच शिवाय दुसºया सहा महिन्यांचा कर थकवला तर त्यावरही लगेचच (विहित मुदतीनंतर) २ टक्के दंडाची आकारणी सुरू होते. या पद्धतीमुळे कर थकवला तर करदात्याला वर्षाअखेरीस किमान १० ते १२ टक्के दंड जमा करावा लागतो. दंड आकारणीच्या या पद्धतीमुळे थकलेल्या कराची रक्कम एकदम फुगत जाते व करदात्याला अखेरीस एकूण रक्कम जमा करणे अशक्य होते.
जून महिन्यापासून ही दरमहा २ टक्के दंड आकारणी सुरू होणार असल्याने सर्व करदात्यांनी त्वरीत
कर जमा करावा असे आवाहन महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने करण्यात
आले आहे.