विनोदातील ‘राजा’चे होणार स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:49 AM2019-04-02T02:49:32+5:302019-04-02T02:49:52+5:30
कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचा पुढाकार
नम्रता फडणीस
पुणे : निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील ‘राजा’ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही ‘राजा गोसावी’ नावाची जादू ओसरलेली नाही. आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटविणाऱ्या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन होणार आहेत. कै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
‘सौजन्याची ऐशीतैशी’, ‘करायला गेलो एक’, ‘लग्नाची बेडी’, ‘डार्लिंग डार्लिंग’ यासारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ यासारखी संगीत नाटके तसेच ‘अवघाची संसार’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘हा खेळ सावल्यांचा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले.
इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साताºयापासून दहा किलोमीटरवर असलेल्या ‘लिंब’ या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे. ‘लिंब’मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. याला शासनाने हिरवा कंदील दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष
दिनेश गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.
जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे हे स्मारक उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत.
स्वतंत्र कलादालन...
४या स्मारकात राजा गोसावी यांच्या नाटक , चित्रपटांचे स्वतंत्र कलादालन, त्यांच्या कलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. मात्र, केवळ स्मारकापुरतेच याचे स्वरूप मर्यादित न ठेवता तरुण पिढीसाठी अभिनयाच्या कार्यशाळांवर अधिक प्रमाणात भर दिला जाणार आहे. जुन्या कलाकारांच्या अभिनयाचा अभ्यास नव्या पिढीने करावा, हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे.
४पूर्वी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)मध्ये ‘विनोद’ हा विषय अभ्यासक्रमाला होता. राजा गोसावी यांची नाटके, चित्रपट आवर्जून पाहा, असे सांगितले जायचे. हे स्वत: अभिनेते असरानी यांनी आम्हाला सांगितले होते. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय आज तरुण पिढीला पाहायला मिळत नाही.
४मात्र, जुन्या कलाकारांची नावे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. राजा गोसावी यांचा सहजसुंदर अभिनय, त्यांची विनोदाची पद्धत कार्यशाळेमधून शिकविली जाणार आहे. मेकअप, वेशभूषा आदी चित्रपटांशी निगडित विविध कलांचे ज्ञानही युवा पिढीला देणार आहोत.