तमाशासम्राज्ञी विठाबाई यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:33 AM2019-02-09T00:33:31+5:302019-02-09T00:34:41+5:30
नारायणगावचे भूषण व तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ च्या जागेमध्ये दोन एकर जागा देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाकडे पाठविला असल्याने स्मारकाचा प्रलंबित विषय येत्या काही महिन्यांमध्ये मार्गी लागणार आहे.
नारायणगाव - नारायणगावचे भूषण व तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ च्या जागेमध्ये दोन एकर जागा देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाकडे पाठविला असल्याने स्मारकाचा प्रलंबित विषय येत्या काही महिन्यांमध्ये मार्गी लागणार आहे. हा प्रस्ताव जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशाने पाठविण्यात आल्याने स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, अशी माहिती स्व. विठाबाई यांचे नातू व अखिल भारतीय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष मोहित नारायणगावकर यांनी दिली.
स्व. विठाबाई नारायणगावकर यांनी वयाच्या १४व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून लोककलेची जोपासना केली. आपल्या कलेच्या आधारे संपूर्ण भारतात लोकनाट्य तमाशाचा लौकीक वाढविला. त्यांच्या कलेची दखल घेवून सरकारकडून त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले. उतरत्या वयातही त्यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकुल झाल्याने त्या वयातही त्यांनी आपली कला सादर करून कुटूंबाचा उदरनिर्वाह केला.
दि.१५ जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्मारक उभारण्यासाठी भगवान वैराट यांच्या अध्यक्षतेखाली व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नारायणगाव येथील जागेचा सर्वे करण्यात आला होता. नारायणगाव व वारूळवाडी येथील तीन जागेंची पाहणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, सत्तांतरानंतर स्मारकाचा विषय प्रलंबित राहिला होता. गेली १२ वर्षांपासून स्मारकाच्या निर्णयाबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने हा प्रश्न मागे पडला होता.
मात्र, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली २.५ एकर जागा देण्याचा प्रस्ताव नियमक आयोगाच्या बैठकीत सादर केला.
यानंतर तातडीने कुकडी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्या आदेशाने नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांनी नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या दोन जागेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होवून स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती मोहित नारायणगावकर यांनी दिली.
प्रस्ताव करण्यात आला सादर : कानडे
नारायणगाव कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांचेशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव गेल्या महिन्यात कुकडी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.