चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 07:59 PM2018-01-31T19:59:35+5:302018-01-31T19:59:50+5:30
आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
- हनुमंत देवकर
चाकण : आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. माघी पौर्णिमेनिमित्त खेड तालुक्यातील खरपूडी, मेदनकरवाडी व चाकण येथील खंडोबा माळावर लाखो भाविकांनी आज खंडोबाचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. तालुक्यातील सर्वात मोठी ही यात्रा असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 'खंडोबाच्या नावानं चांगभलं, सदानंदाचा येळकोट' चा गजर करीत भाविकांनी खंडोबा मंदिरात भंडार, खोबऱ्याची तळी भरून उधळण केली.
मेदनकरवाडीत सकाळी खंडोबाची पूजा करून हारतुरे व मांडव डहाळे काढण्यात आले. दुपारी दोन वाजता बैल गाड्यांची मिरवणूक काढून यात्रेत विशेष महत्व असलेल्या देवाच्या बारा गाड्याचा कार्यक्रम झाला. या गाड्याला इतर गाडे जोडून भाविक भक्त करंगळी लावून गाडे ओढतात. हे गाडे पाहण्यासाठी खेड, हवेली, मावळ व शिरूर तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील भाविक परंपरेनुसार अजूनही बैलगाडीतून दर्शनाला येतात. दुपारी तीन ते सहा या वेळेत कुस्त्यांचा आखाडा पार पडला. सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या पदाधिकार्यांनी यात्रेत चोख प्रशासन व्यवस्था ठेवली. देवाचे पुजारी भुजबळ यांनी गाभाऱ्यात शिस्तीत भाविकांचे देवदर्शन करून घेतले.
श्री क्षेत्र खरपुडी येथे माघी पौर्णिमेनिमित्त कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. "सदानंदाचा येळकोट"चा जयघोष, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता खंडोबाची पूजा, अभिषेककरून कुलदैवताच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पालखीची गावामधून मिरवणूक काढून गडावर आणण्यात आली. मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांसह भाविक सहभागी झाले होते. खरपुडीच्या गडावर भाविकांनी व नवविवाहित दाम्पत्यांसाठी वाघ्या मुरळींनी संबळ व दिमडीच्या ठेक्यावर खंडोबाची गाणी म्हणत जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. पुणे जिल्ह्यासह, मुंबई, ठाणे, संगमनेर, नगर जिल्ह्यातील भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी खरपुडी येथे गर्दी केली होती. भाविकांना दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. महोत्सव सुलभ होण्यासाठी यात्रा कमिटी च्या संयोजनाखाली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.