Celestial Magic | चंद्राच्या मागे उगवली शुक्राची चांदणी! पिधान युतीचा आनंद
By श्रीकिशन काळे | Published: March 24, 2023 08:10 PM2023-03-24T20:10:19+5:302023-03-24T20:10:58+5:30
दुर्बिणीतून अधिक स्पष्टपणे ही युती पाहायला मिळाली...
पुणे : पश्चिमेला आकाशात शुक्रवारी (दि. २४) चंद्र आणि शुक्राची पिधान युती पुणेकरांना पाहायला मिळाली. महाराष्ट्रातही ही युती डोळ्यांनी दिसली. दुर्बिणीतून अधिक स्पष्टपणे ही युती पाहायला मिळाली. चंद्रकोराशेजारी हा शुक्र पाहणे औत्सुक्याचे ठरले.
जेव्हा चंद्र एखाद्या तेजस्वी तारा किंवा ग्रहासमोरून जातो. त्यावेळी तो तारा किंवा ग्रह काही काळासाठी दिसेनासा होतो. अशा प्रकारच्या घटनेला पिधान युती असे म्हटले जाते. शुक्रवारी चंद्र शुक्राच्या समोरून गेला. त्यामुळे ही पिधान युती पाहायला मिळाली. शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता पश्चिम आकाशात चंद्रकोरीच्या वरील बाजूला शुक्र स्पर्श करेल असे दिसले आणि तो चंद्राच्या पाठीमागे नाहीसा झाला. त्यानंतर तो दुसऱ्या बाजूने बाहेर आला.
ही घटना सायंकाळी घडत असताना पश्चिम आकाशात सूर्य मावळलेला नव्हता. तेव्हादेखील ही युती दिसत होती. एका सुंदर अशा खगोलीय घटनेला नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची अपूर्व संधी शुक्रवारी नागरिकांना मिळाली. यावेळेस आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र मात्र ३ लाख ७२ हजार ७०२ किलोमीटर अंतरावर होता. जवळपास ९५ मिनिटे चंद्रकोरा मागे शुक्र ग्रह लपला होता. सायंकाळी ५.५० वाजता तो चंद्राच्या खालील बाजूस समोर आला आणि विलोभनीय पिधान युती सुटली.