वीजजोड तोडणीला दिलेली स्थगिती पुन्हा उठवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:12+5:302021-03-14T04:12:12+5:30
उरुळी कांचन : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजजोड तोडणीला दिलेली स्थगिती अधिवेशन संपण्याच्या दिवशी उठवल्याने वीज ग्राहकांमध्ये ...
उरुळी कांचन : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजजोड तोडणीला दिलेली स्थगिती अधिवेशन संपण्याच्या दिवशी उठवल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य सरकारच्या या फसवणुकीमुळे टीकेची झोड उठत आहे. वीज बिलावर आकारलेले व्याज व दंड व्याज माफ करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
मागीलवर्षी लॉकडाउनच्या काळातील वीज बिल माफ करून नंतरचे बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी ग्राहक करीत आहेत. मात्र, वीज वितरण कंपनीकडून विज जोड तोडणीचा धडाका सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात जनता मेटाकुटीला आली आहे.
थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करताच शुक्रवारी (ता. १२ ) हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, कोरेगाव मूळ, अष्टापुर, व उरुळी कांचन परिसरातील ८० जणांचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी दिली. यामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांना अंधारात चाचपडत जगण्याची वेळ आली आहे.
मागीलवर्षी लॉकडाउनच्या काळापासून वीजबिले थकीत आहेत, यानंतर काही प्रमाणात वीज बिल भरण्याची मानसिकता नागरिकांची होती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांच्या जेष्ठ ते कनिष्ठ पुढाऱ्यांनी विधानसभा निवडणुका दरम्यान विजबिल माफ होणार, आपल्या पक्षाची सत्ता आली की वीज बिल माफ होणारच, बील भरू नका असे प्रबोधन करीत मतदारांकडून मते पदरात पाडून घेतली व त्यानंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला. यामुळे अनेक जण या फसवणुकीला बळी पडले व विजबिल भरणा केला नाही. त्यामुळे त्यांना मागील वर्षापासूनचे विजबील भरावे लागणार आहेच. शिवाय त्या वर व्याज... दंडव्याज असा भरमसाठ भरणाही करावा लागणार असल्याने ग्राहकांच्या नाकीनऊ आले आहेत.
चौकट
राज्य शासनाने घरगुती, व्यावसायिक, व औद्योगिक क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्यानंतर उरुळी कांचन येथे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे कर्मचाऱ्यांसह थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी फील्डवर उतरल्याने उरुळी कांचन उपविभाग क्षेत्रात काल पासून वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. उरुळी कांचन येथील अनेक ग्राहकांचे वीज जोड तोडणी महावितरण कडून करण्यात आली. दरम्यान, ही धडक कारवाई उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, सहाय्यक अभियंता संजय पोफळे, गजानन मोरे, नयीम सुतार व अन्य कर्मचारी यांनी केली आहे.
कोट
वीज ग्राहकांनी थकीत बिले तातडीने भरणा करावी, त्यासाठी त्यांना एकदम भरता येणे शक्य नसल्यास हप्ते करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे थकबाकीदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे.- प्रदिप सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन उपविभाग.
फोटो ओळ :- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करताना महावितरणचे कर्मचारी.