चौथ्या टप्प्यात १० लाखांहून अधिक डोसची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:12+5:302021-04-01T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आजपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या तयारीला वेग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. एकूण लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिक या वयोगटातील आहेत. याचाच अर्थ लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यासाठी १० लाखांहून अधिक डोसची जिल्ह्याला गरज भासणार आहे. लसींचा पुरेसा आणि वेळेत पुरवठा न झाल्यास लसीकरणाचा चौथा टप्पा संथ गतीने पार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले. दुसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, पहिल्या तिन्ही टप्प्यातील लसीकरणही अजून सुरू आहे. लसींचे पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने अनेक केंद्रांवर सुरुवातीच्या टप्प्यात गोंधळ उडाला होता. त्यामुळे चारही टप्प्यांतील लसीकरणाचे नियोजन करताना कुठेही गोंधळ निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या ३१६ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात १०८ लसीकरण केंद्रे वाढवली आहेत. १ एप्रिलपासून ३०० उपकेंद्रांमध्ये लस देण्याचे नियोजन असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. सर्व केंद्रांना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
-----
पुणे जिल्हा लसीकरण स्थिती :
आरोग्यसेवक-१,०६,२४३
फ्रंटलाईन वर्कर्स-८१,६०५
ज्येष्ठ नागरिक-५७,१२४
४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त-२,६८,४६६
-------
लसींची उपलब्धता -
* कोव्हीशिल्ड
प्राप्त लस -७,०१,४८०
वापरलेली लस - ५,०८,१८०
शिल्लक-१,९३,३००
* कोव्हकसिन
प्राप्त लस-१,१२,४००
वापरलेली लस-८७,३५२
शिल्लक-२५०४८
----
लसीकरणाची प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. दर आठवड्याला शासनाकडून लसींचे डोस उपलब्ध होत आहेत. एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात होणार आहे.
- डॉ. संजय देशमुख, आरोग्य उपसंचालक, पुणे विभाग