बारामती तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक महिलांच्या हाताला मिळाली कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 07:34 PM2021-02-11T19:34:30+5:302021-02-11T19:35:41+5:30
ग्रामीण भागात बचत गट ही एक महिला सबलीकरण,सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुप्त चळवळ मानली जाते
अविनाश हुंबरे -
सांगवी : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उभारण्यात आलेल्या लघु उद्योगाच्या माध्यमातून ११ हजार ८० महिला एकत्र येऊन त्यांच्या हाताला कामे मिळू लागली असून आपली आर्थिक उन्नती साधू लागल्या आहेत. हजारो महिला आता एकत्रित येऊन उद्योग व्यवसायातून आर्थिक साक्षरतेच्या दिशेने उभारी घेत असल्याचे समोर आले आहे.
बारामती तालुक्यात ९९ गावांसह शहरात नोंदणीकृत १ हजार १०८ पेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता बचत गट सुरु आहेत.वर्षभरात १८५ बचत गटांना सव्वा चार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून बारामती तालुक्यातील बचत गटाच्या महिलांमध्ये उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे, तर सध्या तालुक्यात जवळपास ९६ टक्के महिला बचत गटाच्या माध्यामातून उद्योग व्यवसायामुळे हाताला कामे मिळू लागल्याने सक्षम झाल्या असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागात बचत गट ही एक महिला सबलीकरण,सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुप्त चळवळ मानली जाते. बचत गटामुळे आज कित्येक महिलांना समाजात आत्मसन्मानासह स्वत:चा ठसा उमटवता आला आहे, यामुळे त्या स्वावलंबी बनू लागल्या आहेत. राज्यातील महिलांना बचत गटातून आर्थिक उन्नती जलद गतीने व्हावी, यासाठी ग्रामीण महिला वर्गाला बचत करण्यास प्रवृत्त करून शासनाच्या विविध योजनेद्वारे वित्त सहाय्य व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने महिला बचत गट वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र, ग्रामीण भागात महिला वर्ग बचत गट स्थापन करत असताना येणाऱ्या अडचणी, उद्योग व्यावसायासाठी लागणारे पुरेपूर प्रशिक्षण, बँक कर्ज, वस्तूंच्या विक्रीसाठी आवश्यक बाजारपेठ,व्यवसायाचे अनुभव यावर प्रकाश टाकण्यासाठी बारामतीच्या प्रेरणा कमलाकर कांबळे यांनी संशोधन करून प्रबंध लिहिला आहे. व्यवसायातून महिलांच्या चांगल्या कामाचा आढावा घेत त्यांना येणाऱ्या समस्या देखील समोर मांडल्या आहेत.
याबाबत त्यांना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील उद्योजकतेकडे वळलेल्या महिला ‘स्वयंसाह्यता’ बचत गटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा अभ्यास या त्यांच्या प्रबंधाबाबत कांबळे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.