दीड लाखांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:02 AM2019-12-11T11:02:17+5:302019-12-11T11:10:31+5:30
राज्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार
सुषमा नेहरकर-शिंदे -
पुणे : शेतकऱ्यांचे हितासाठी, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बैठकांवर बैठका घेत असल्याचे सांगणाऱ्या महाशिव आघाडी सरकार सत्तेवर येऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीपासून वंचितच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २ लाख ६० हजार ८९३ शेतकऱ्यांचे १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी राष्ट्रपती राजवटीत आलेल्या ४० कोटींचे प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटप केले आहे.
राज्यासह जिल्ह्यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पुणे जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ८९३ शेतकºयांना मोठा फटका बसला. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सुमारे १३८ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर नाटक सुरू होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुकीनंतर बिघाड झाल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने, शिवसेना-काँग्रेससह राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांसोबतच द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक शेतकरी आणि फळपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसोबतच शेतांचे बांध वाहून केले, जनावरे पाण्यात वाहून गेली, विहिरी, शेततळ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी तातडीने ४० कोटी रुपयांचा जिल्हा प्रशासनाला मदतनिधी पाठवला. या ४० कोटी रुपयांमध्ये ९५ हजार १४७ शेतकऱ्यांना मदत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.
जिल्ह्यातील तालुकानिहाय वाटप झालेल्या शेतकऱ्यांची माहिती
तालुका वाटप झालेला मदत मिळालेले
निधी शेतकरी
हवेली १ कोटी ५१ लाख ४६००
मावळ १ कोटी ६९ लाख ५९२८
मुळशी ६५ लाख २४००
शिरूर २ कोटी ३ लाख १२०९८
भोर ४२ लाख २०५८
पुरंदर ५ कोटी ७ लाख १०३५८
वेल्हा २४ लाख १४००
जुन्नर ९ कोटी १८ लाख १५१२६
खेड १ कोटी ६० लाख ४१४१
आंबेगाव ५ कोटी ३ लाख ११५८०
दौंड २ कोटी ५५ लाख ६७०३
इंदापूर ३ कोटी ७३ लाख ८५९१
बारामती ५ कोटी ७८ लाख १०१६३
एकूण ३९ कोटी ५४ लाख ९५१४७
.........
- अवकाळी पावसाने एकूण बांधित शेतकरी : २ लाख ६० हजार ८९३
- एकूण कृषी क्षेत्राचे नुकसान : १ लाख २६ हजार ३३४ हेक्टर
- आता पर्यंत आलेली मदत (राष्ट्रपती राजवटतीत) : ४० कोटी रुपये
- मदत वाटप करण्यात आलेले शेतकरी : ९५ हजार १४७
- अद्याप शासनाकडून मदतीची अपेक्षा : ९५ कोटी रुपये
---