हेल्पलाईनवर खाटांसाठी दिवसाला दोनशेहून अधिक कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:23+5:302021-03-23T04:12:23+5:30
पुणे : शहरात दिवसाला तीन हजाराच्या आसपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या व होम आयासोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांना होणारे आॅक्सिजन कमतरेतेचे त्रास, ...
पुणे : शहरात दिवसाला तीन हजाराच्या आसपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या व होम आयासोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांना होणारे आॅक्सिजन कमतरेतेचे त्रास, यामुळे पुणे महापालिकेच्या हेल्पलाईनवर दिवसाला गेल्या आठवड्यापासून दररोज दोनशे ते अडीचशे कॉल येत आहेत़ यामध्ये प्रामुख्याने आॅक्सिजन सोय असलेल्या खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, सर्वांचीच मागणी पूर्ण करणे आता अशक्यप्राय झाले आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्येने २३ हजाराचा टप्पा पार केला आहे़ यातील बहुतांशी रूग्ण होम आयसोलेशनमध्ये असले तरी, कालातंराने व्यवस्थित काळजी न घेतल्याने अनेकांना आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे धाप लागणे, खोकला वाढणे आदी लक्षणे आढळून येत आहेत़ त्यामुळे संबंधित रूग्णांचे नातेवाईक पालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून रूग्णालयांमधील खाटांची मागणी करू लागले आहेत़
आजमितीला विविध रूग्णालयांत ९५८ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू असून, सोमवारपासून सुरू झालेल्या जम्बो हॉस्पिटलमध्येही लागलीच आॅक्सिजन बेडकरिता रूग्णांना पाठविण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे़ सध्या महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील करोनाबाधितांसाठीच्या राखीव खाटा भरत चालल्यामुळे, खाटा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.
कोरोनाबाधितांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासोबतच, त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने ‘कोविड-१९ वॉर रुम’ उभारले आहे. डिसेंबर २०२० किंबहुना जानेवारी २१ पर्यंत दहा वीस कॉल येणाऱ्या या वॉर रूममधील डॉक्टरांना आता स्वत:चे मोबाईलवर आलेले कॉल घेण्यासही वेळ नाही अशी स्थिती पाहण्यास मिळत आहे़
---------------------------------