नवीन वर्षात म्हाडा पुण्यात काढणार आणखी चार हजार घरांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:16 AM2018-12-13T05:16:49+5:302018-12-13T05:17:09+5:30
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे.
- अजय परचुरे
मुंबई : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. ही घरे पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यांमधील असतील, अशी माहिती म्हाडाचे पुणे विभागीय मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. म्हाडाची ४ हजार घरे म्हणजे पुणेकरांसाठी नवीन वर्षाची भेट आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे चार हजार घरांमधील तब्बल साडेतीन हजार घरे एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी येथील म्हाळुंगे परिसरातील आहेत. उरलेली ५०० घरे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत विभागलेली असतील. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटांत ही घरे विभागली आहेत. पुण्यातील ३५०० घरांपैकी काही घरे ही रो हाउस स्वरूपात असतील.
८१२ घरांसाठीच्या लॉटरीचा निकाल १९ डिसेंबरला
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ८१२ घरांसाठीची लॉटरी येत्या १९ डिसेंबरला पुण्यातील अल्पबचत भवन येथे सकाळी ११ वाजता जाहीर होईल. १९ डिसेंबरनंतर म्हाडा अधिकारी ४ हजार घरांच्या पुढच्या लॉटरीसंदर्भातील शेवटच्या टप्प्यातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ही लॉटरी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ४ हजार घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.