पिंपरीत उदघाटनाला ५० हुन अधिक नगरसेवक अन् राजकीय नेते; कोरोना नियमांना तुडवले पायदळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:55 AM2022-01-06T10:55:55+5:302022-01-06T10:57:48+5:30
सामान्य माणसाला नियमांचे पालन करायला लावणाऱ्या नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनी कोरोना नियमांना तुडवले पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकासकांमाची उद्घाटने उरकण्यात आली. पिंपळे गुरव येथील जगताप डेअरी चौकातील आणि सुदर्शन नगर येथील ग्रेड सेपरेटर, बिजलीनगर येथील भुयारी मार्ग, वाकड ते नाशिक फाट्याकडे ग्रेड सेपरेटर डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर, प्रभाग क्र. २९ मधील श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप माध्यमिक शाळा क्र. ५८ चे विस्तारीकरण आदी विकासकामांची उदघाटने झाली. त्यावेळी सर्वच ठिकाणी पन्नासहून अधिक नगरसेवक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तर फिजिकल डिस्टन्स आणि काहींनी मास्कही अर्धवट लावल्याचे दिसून आले. सामान्य माणसाला नियमांचे पालन करायला लावणाऱ्या नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनी कोरोना नियमांना तुडवले पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले.
पिंपरी - चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर पिंपळे सौदागर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. तर भाजपाने थेरगाव येथील उद्घाटनाबाबत राजकारण केल्याने शिवसेनेने बहिष्कार टाकला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक या महिन्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या वतीने आज विविध विकासकामांची उद्घाटने करण्यात आली.
राष्ट्रवादीने उरकले उद्घाटन
पिंपळे सौदागर जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन अकराला होणार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ते सकाळी साडे नऊलाच उरकून टाकले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते. त्यानंतर भाजपाने त्याच ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साडे अकराला उद्घाटन केले.
शिवसेनेचा बहिष्कार
थेरगाव येथील डांगे चौक येथे ग्रेडसेपर उभारला आहे. भाजपाने थेरगाव येथील उद्घाटनाबाबत राजकारण केल्याने शिवसेनेने बहिष्कार टाकला. शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, नगरसेवक निलेश बारणे अनुपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख भोसले म्हणाले, ‘‘महापालिकेचा कार्यक्रम असताना सत्ताधारी भाजपाने यात राजकारण केले. महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपाचे झेंडे होते. त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला होता.’’