अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:46 AM2018-08-17T00:46:56+5:302018-08-17T00:47:40+5:30

राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.

More admissions than capacity in FYJC , education department complaints | अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

googlenewsNext

पुणे - राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकांद्वारे या महाविद्यालयांची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जादा प्रवेश दिले असल्यास ते तातडीने रद्द करण्याचे आवाहनही विभागाने महाविद्यालयांना केले आहे.
राज्यात सध्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडसह अन्य सहा महानगर क्षेत्रामध्ये ही प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर अन्यत्र महाविद्यालयस्तरावरच ही प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान राज्यातील काही महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी माध्यमिक शिक्षण उपसंचालक, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरामध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये प्रत्येकी चार भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील या पथकांमध्ये तीन प्राचार्यांचा समावेश असेल.
इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या सहा महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश लगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात घेतले असल्यास आणि संबंधित महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश झाले असल्यास विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये येऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’ प्रणालीतील माहिती दि. ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयांची मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवेश रद्द करा
ज्या महाविद्यालयांनी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाने तसेच विद्यार्थ्यांनी हे प्रवेश रद्द करावेत, असे आवाहन सुवर्णा खरात यांनी केले आहे. या सूचनेप्रमाणे कार्यवाही न करणाºया उच्च महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसण्याची संधी न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे खरात यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: More admissions than capacity in FYJC , education department complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.