महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीच्या जादा बस; पाषाण, नसरापूर, निळकंठेश्वर, धायरेश्वर, सोमेश्वरवाडीकडे बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:06 AM2018-02-12T05:06:47+5:302018-02-12T05:07:00+5:30
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.
पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘पीएमपी’कडून सोमेश्वरवाडी (पाषाण), बनेश्वर (नसरापूर), निळकंठेश्वर (रूळे) व धायरेश्वर मंदिर (धायरी) या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. स्वारगेट ते बनेश्वर, नेहरू स्टेडियम ते रूळेगाव, मनपा भवन ते पाषाण आणि स्वारगेट नटराज हॉटेल ते धायरी हे मार्ग असतील. स्वारगेट बसस्थानकातून पहाटे ३.३० वाजता रुळेगावपर्यंत तर बनेश्वरसाठी सकाळी ६ वाजता पहिली बस सोडली जाणार आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातूनही शिवरात्रीनिमित्त जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना दर्शनासाठी इच्छित स्थळी जाता येणार आहे.
मनपा भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी पहिली बस सकाळी ६ वाजता सोडली जाणार आहे. रूळेगाव याठिकाणी विशेष बससेवा देण्यात येणार असल्याने या मागावरील प्रवाशांसाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ टक्के जादा दराची आकारणी करण्यात येईल. पासधारकांना या मार्गावर सवलत मिळणार नाही, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.