बुधवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:07+5:302021-04-15T04:11:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात बुधवारी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात बुधवारी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे़ शहराच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल़ तसेच कोरोनामुक्तीकडे पुण्याची वाटचाल सुरू झाली असे म्हणता येऊ शकेल, अशी आशा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे़
बुधवारी शहरात नव्याने ४ हजार २०६ कोरोनाबाधित आढळून आले असले तरी, कोरोनामुक्त होणाऱ्यांची आजची संख्या ही ४ हजार ८९५ इतकी आहे़ जानेवारी, २०२१ च्या पहिल्या आठवड्यात असे चित्र शहरात दिसून आले होते़ त्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आज अधिक दिसून आली आहे़
आज दिवसभरात २१ हजार ३२५ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १९.७२ टक्के इतके आहे़ गेल्या काही दिवसांपासून २५ टक्क्यांच्या आसपास असलेली बाधितांची टक्केवारीही आज २० टक्क्यांच्या आत आली आहे़ दरम्यान आज दिवसभरात शहरातील ४६ तर शहरात उपचार घेणाऱ्या बाहेरील २० कोरोनाबाधितांचा अशा ६६ जणांचा मृत्यू झाला आहे़ आजचा मृत्यूदर हा १.७१ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ३७४ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार १५८ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १७ लाख ८६ हजार ६७१ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ३ लाख ४४ हजार २९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी २ लाख ८४ हजार ८०१ कोरोनामुक्त झाले आहेत़
---
शहरासाठी आशादायी चित्र
शहरात साडेसात हजारांपर्यंत गेलेला कोरोनाबाधितांचा वाढीचा आकडा, गेल्या तीन-चार दिवसांपासून साडेचार ते पाच हजाराच्या दरम्यान आला आहे. तसेच आज कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. हे चित्र शहरासाठी आशादायी असून, पुढील दहा पंधरा दिवस असेच चित्र शहरात राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी होऊन रूग्णालयात बेड मिळण्याची चणचण पूर्णत: कमी होईल. तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिक राहिल्यास कोरोनामुक्त शहराकडे पुण्याची वाटचाल सुरू होत होईल़
डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका