रुग्णांचा गृह विलगीकरणावरच अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:42+5:302021-02-23T04:17:42+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. परंतु, ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात रुग्णालयांमधील खाटांची ...
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. परंतु, ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात रुग्णालयांमधील खाटांची मागणी वाढलेली नाही. यामागे कोरोना रुग्णांची लक्षणे अतिशय सौम्य असणे हे एक कारण आहे. यासोबतच रुग्णांकडून ‘गृह विलगीकरणात’ राहून उपचार घेण्यावरच अधिक भर देण्यात येत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
शहरातील कोरोना रुग्णांची टक्केवारी मागील आठवड्यात वाढली. झपाट्याने वाढत चाललेल्या या आकड्यांमुळे प्रशासनही सतर्क झाले असून, खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली, तसतशी रुग्णालयातील खाटांची संख्या कमी पडू लागली होती. या काळात अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट करण्याचेही प्रकार समोर आले. यासोबतच अनेकांना आयसीयू आणि आॅक्सिजन खाटा न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.
प्रशासकीय पातळीवर उपाययोजना राबवित रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन आणि व्हेंटीलेटर खाटा वाढविणे, जम्बो रुग्णालय उभारणे आणि खासगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेण्याच्या उपाययोजना केल्या होत्या. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण नोंदविले गेले होते. त्यानंतर रुग्ण हळूहळू कमी होत गेले. या दरम्यान, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहून उपचार घेण्याची मुभा देण्यात आली होती. अद्यापही रुग्णांकडून गृह विलगीकरणाच्याच पर्यायाला अधिक पसंती दिली जात आहे.
-----
शहरात आजमितीस २ हजार ९०२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १ हजार ९८१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर, ९२१ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७२ रुग्ण अत्यवस्थ असून ३७९ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.