क्रीडा क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या संधी अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:39+5:302021-06-27T04:08:39+5:30
पुणे : क्रीडा क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या वाढत्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी क्रीडा विद्यापीठ अत्यंत गरजेचे ...
पुणे : क्रीडा क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या वाढत्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी क्रीडा विद्यापीठ अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे होणाऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी जागा, सुविधांची पाहणी, तज्ज्ञांसोबत आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.
पवार म्हणाले की, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन, पूरक उद्योग, क्रीडा प्रशिक्षण आणि तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी क्रीडा विद्यापीठ महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशिक्षण यांचे अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. क्रीडा विद्यापीठासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे त्यात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने विद्यापीठाच्या कामाला गती दिली आहे. त्यामुळेच हे विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होईल, असेही ते म्हणाले.
क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले की, विद्यापीठाची उभारणी करताना या क्षेत्रातील गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांसोबत विचारविनिमय करण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्रीडा विद्यापीठासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही केदार यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाची आवश्यकता, ध्येय, उद्देश या विषयांवरील सादरीकरण क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.
कुलगुरुंबाबत मौन
क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणत्या नावांची चर्चा झाली याबाबत उत्तर देण्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी टाळले. या बैठकीत विद्यापीठ शासक परिषद नियुक्ती, अनुदान आयोग मान्यता, विद्याशाखा, सुविधा, सल्लागार नियुक्ती, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य, आयआयटी मुंबई, आयआयएम अहमदाबाद यांच्याशी सहकार्य करार याबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठासाठी जगभरातील अव्वल दहा विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
जुन्या खेळाडूंना मिळणार संधी
बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल स्पर्धा सुरू केली. त्यामुळे अनेक जुन्या खेळाडूंना संधी मिळाली. या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक जुन्या खेळाडूंना विविध संधी मिळतील. उद्योग क्षेत्राच्या माध्यमातूनही खेळाडूंना नव्या संधी मिळू शकतील, त्यासाठी क्रीडा मंत्र्यांशी प्रयत्न करावेत, असेही पवार म्हणाले.
क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे, हा विद्यापीठ स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. क्रीडाविषयक नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, दर्जेदार प्रशिक्षक घडवणे, क्रीडा क्षेत्रात येण्यास तरुणांना व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे ही उद्दिष्टे आहेत.
- सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री
फोटो - बालेवाडी न्यूज