पन्नास टक्क्यांहून अधिक लेबर कॅम्प धोकादायक स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:00 AM2019-07-03T07:00:00+5:302019-07-03T07:00:02+5:30
कोंढवा दुर्घटनेनंतर दोनच दिवसांत आंबेगवा येथील सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल सहा मजूरांना आपले प्राण गमवावे लागले.
- सुषमा नेहरकर-शिंदे -
पुणे : सोसायट्या अथवा प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा आधार घेऊन उभारण्यात आलेले लेबर कॅम्प..साधा सिमेंट कोबा न करताच मातीवरच उभारण्यात आलेल्या पत्र्यांच्या शेड.. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या शेडमध्ये आलेले पावसाचे पाणी... शेडमध्ये मातीला ओल आल्याने सिमेंटच्या रिकाम्या गोण्या टाकून केलेली सोय...शेडसाठी वापरलेले तुटलेले, छिद्र असलेले पत्रे.... यामुळे पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून लाकडाच्या फळ्या... १०-२० मजुरांसाठी असलेले एखादे दुसरे स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची कोणतही सोय नाही... ही स्थिती आहे आंबेगाव येथे दुर्घटना झालेल्या लेबर कॅम्पपासून काही किलोमीटरच्या अंतरामध्ये. लोकमतच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये वरील धक्कादायक वास्तव समोर आले.
कोंढवा दुर्घटनेनंतर दोनच दिवसांत आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल सहा मजूरांना आपले प्राण गमवावे लागले. बांधकाम व्यावसायिकांच्या बेफिकिरीमुळे आजही शहरातील शेकडो धोकादायक लेबर कॅम्पमध्ये हजारो मजुर मृत्युच्या छायेखाली जगत आहेत. याबाबत मंगळवार (दि.२) रोजी लोकमतच्या वतीने आंबेगाव आणि परिसरातील काही लेबर कॅम्पची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यामध्ये आंबेगाव येथे दुर्घटना झालेल्या लेबर कॅम्पपासून काही किलो मिटरमध्येच मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. यामध्ये बहुतेक सर्वच लेबर कॅम्प धोकादायक स्थितीतच असल्याचे आढळून आले. बहुतेक लेबर कॅम्प एखादी सोसायटी अथवा नव्याने बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पांच्या सीमाभिंतीचा आधार घेऊनच उभारण्यात आली आहेत. मातीवरच उभारण्यात आलेल्या काही लेबर कॅम्पमधील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. येथे काही प्रकल्प मिळून लहान-मोठे लेबर कॅम्प उभारण्यात आले आहेत. काही मोठ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र लेबर कॅम्प प्रकल्पाच्या लगतच उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला लागून उभारण्यात आले आहेत. तर काही मजूर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्लॅब घालीच धोकादायक पध्दतीने राहात आहेत. यामध्ये प्रामुख्याने छत्तीसगड, बिहार, बीड, उस्मनाबाद येथील मजूर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपल्या मुकादम, साहेब कामावरुन काढून टाकेल या भीतीने आपल्या गैरसोय, असुविधाबाबत एकाही मजूर बोलण्यास तयार नव्हाता. तर बीड, उस्मनाबाद येथील मजूरांनी सांगितले ते कोणत्याही एका ठराविक व्यावसायिकासाठी काम करत नसून, काम मिळेल तसे व वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जात असल्याचे सांगितले. परंतु, हे मजूर देखील अत्यंत धोकादायक पध्दतीने राहत असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले.
-----------------
समाविष्ट गावांमध्ये मजूरांची स्थिती अधिक धोकादायक
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावे व या समाविष्ट गावांच्या हद्दीलगत गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. मोठे, नामांकित बांधकाम व्यावसायिकांपासून नव्याने तयार होणारे हौसे-नवशे बांधकाकाम व्यावसायिक यांच्या मार्फत ही बांधकामे सुरु आहेत. यासाठी प्रकल्पांच्या ठिकाणी लेबर कॅम्प उभारण्यात आले आहेत. तर काही प्रकल्पांपासून लगत असलेल्या मोकळ्या जागांमध्ये हे लेबर कॅम्प उभारण्यात आले आहेत. परंतु, अनेक ठिकाणी लेबर कॅम्प धोकादायक व मजूरांची स्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे.